Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या सात संस्थांपैकी पाच संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. याचदरम्यान, एक्झिट पोल व्यतिरिक्त सट्टा बाजारही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही करडी नजर ठेवून आहे. बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत.
बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराचा अंदाज काय?
बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजाराच्या अंदाजानूसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
फलोदी सट्टा बाजारचा अंदाज काय?
आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे. भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागताना दिसत आहे.
23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार-
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या. मात्र तरीदेखील उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.