Adani Group Stocks: देशातील मोठे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा दणका बसला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये (Adani Group Stock) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकन न्यायालय आणि नियामकाने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल गौतम अदानी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून, समूहातील अनेक कंपन्यांमध्ये लोअर सर्किट (lower circuit) लागू करण्यात आले आहे.


अदानी समूहाच्या 'या' कंपन्यांमध्ये लोअर सर्किट लागू 


अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जी आणि अन्य एका फर्मवर अमेरिकेत कंत्राट मिळवण्यासाठी सुमारे 2236 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. यानंतर अदानी विल्मर, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे. अदानी समूहाच्या इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे.


लोअर सर्किट म्हणजे नेमकं काय?


अनेक वेळा कंपनीचे शेअर्स झपाट्याने घसरतात. अशा स्थितीत स्टॉक जास्त पडू नये म्हणून सर्किट बसवले जाते. अशा परिस्थितीत जर प्रत्येकाने अचानक एखाद्या कंपनीतील शेअर्स विकायला सुरुवात केली तर त्या शेअरचे मूल्य एका ठराविक मर्यादेपर्यंत कमी होऊन त्याचा व्यवहार थांबतो. किंमत कमी करण्याच्या या मर्यादेला लोअर सर्किट म्हणतात. लोअर सर्किटमध्ये 3 टप्पे असतात. त्यावर 10 टक्के, 15 टक्के आणि 20 टक्के घट लादण्यात आली आहे.


अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण 


अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 564 अंकांनी घसरून 2257.15 वर आला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 20 टक्क्यांनी घसरल्यानंतर लोअर सर्किटला आले आहेत. अदानी समूहाशी निगडित प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची अवस्था जवळपास अशीच आहे. अदानी सोल्युशन, अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी पोर्ट या सर्व समभागांमध्ये 15 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अमेरिकेत ज्या प्रकारे गौतम अदानीबद्दलच्या बातम्या आल्या, त्यानंतर समूहाच्या शेअर्सची प्रचंड विक्री झाली, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली.


कोणत्या शेअर्समध्ये किती घसरण?


अदानी पॉवरच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात 13 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. अदानी पॉवरचा शेअर 68 अंकांच्या घसरणीसह 454 वर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, अदानी सोल्यूशनच्या शेअर्समध्ये 19.99 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामध्येही लोअर सर्किट असून हा शेअर 697 वर व्यवहार करत आहे.अदानी पोर्टच्या समभागांबद्दल बोलायचे झाले तर ते 20 टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटला आले आहे. हा शेअर 257 अंकांच्या घसरणीसह 1031.70 वर व्यवहार करत आहे. अदानी ग्रीनचे शेअर्स 19 टक्क्यांनी घसरले आहेत. हा शेअर 266 अंकांच्या घसरणीसह 1145 वर व्यवहार करत आहे.


शेअर बाजारात आज घसरण


शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 522.80 अंकांनी घसरून 77,055.58 वर आला, 0.67 टक्क्यांची घसरण दर्शवित आहे. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 200.30 अंकांची घसरण दिसून आली, जी 23,318.20 वर बंद झाली, जी 0.85 टक्क्यांची घसरण दर्शवते.


महत्वाच्या बातम्या:


Adani Group: अदानी ग्रुपवर 250 दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचा गंभीर आरोप, अमेरिकेत गुंतवणूकदारांची फसवणूक केली? काय आहे प्रकरण?