Sanjay Raut On Gautam Adani: भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) आज खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी (Gautam Adani) आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या (Adani Industries Group) मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स साधार 10 ते 20 टक्क्यांनी घसरले आहेत.
गौतम अदानींमुळे संपूर्ण भारताची बदनामी-
गौतम अदानींच्या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 256 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याप्रकरणी ट्रम्प सरकारने अटक वॉरंट जारी केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनाने आदानींविरोधात अटक वॉरंट काढले आहे. धारावी प्रकल्प प्रकरणात अदानींनी हस्तक्षेप केला आहे. टेंडरमध्येही अनियमितता आहे. यामुळे गौतम अदानींमुळे आता संपूर्ण भारताची बदनामी होत आहे.
मविआला पराभूत करण्यासाठी अदानींनी 2000 कोटी रुपये खर्च-
पंतप्रधान नरेंद्र मोदी बंदर, विमानतळ, धारावी, महामार्ग असे सर्व प्रकल्प अदानींना देत आहेत. या सर्व प्रकल्पांमध्येही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी अदानींनी 2000 कोटी रुपये खर्च केले, असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमचे सरकार आले तर आम्ही अदानींविरोधात चौकशी करू...अदानींविरुद्ध किमान 100 एफआयआर नोंदवल्या जातील, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
गौतम अदानी यांच्यावर नेमका आरोप काय?
भारतातील सर्वांत मोठा सौरउर्जी निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळावे यासाठी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 250 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले होते. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षांत साधारण 2 अब्ज डॉलर्सचा नफा मिळणार होता. तसेच कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यापासून हा भ्रष्टाचार लपवून गौतम अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे सीईओ विनीत जैन यांनी 3 अब्ज डॉलर्स किमतिचे बॉण्ड्स आणि रोखे जमा केले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.