भोसरी विधानसभा मतदार संघ हा शिरूर लोकसभेचा घटक आहे. 2009 च्या पुनर्रचनेत हा मतदार संघ स्थापन झाला. अनेक छोट्या-मोठ्या गावांचा यात समावेश असून पिंपरी विधानसभेच्या तुलनेत इथं झोपडपट्टीचा परिसर फारच कमी आहे, तर मराठा समाजाचं इथं प्राबल्य आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या परिसरातून इथं अनेक नागरिक स्थलांतरित झालेत. उड्डाण पूल, स्पाईन रोड, मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती अन राज्यस्तरीय कुस्ती मैदान असा बराचसा विकसित भाग या मतदार संघात येतो. रेड झोन, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत बांधकामावर आकारला जाणारा दंड अर्थात शास्ती कर, कचरा डंपिंग ग्राउंड अशी वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न या मतदार संघाशी निगडित आहेत.
2009 साली विद्यमान आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. शिवसेना अर्थात युतीचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांना चितपट करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. मात्र लांडे यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर होऊ घातलेल्या 2009च्या विधानसभेसाठी ही ते तीव्र इच्छुक होते. पण त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने मंगला कदम यांना तिकीट दिलं. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या लांडेंनी बंडखोरी केली आणि ते निवडून आले. अपक्ष आमदार झालेल्या लांडेंनी स्वगृही परतत 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून मात्र लांडे चार हात लांबच राहिले. मग पक्षाने देवदत्त निकम यांच्या रूपाने नशीब अजमवलं. पण तरी ही शिवसेना अर्थात युतीच्या आढळरावांनी गड राखला. भोसरी विधानसभेत लांडे आमदार असताना ही युतीला विक्रमी मताधिक्य मिळालं. लोकसभेला अनुत्सुक असणारे लांडेंनी 2014च्या विधानसभेसाठी शड्डू ठोकले होते, पक्षाने ही त्यांना तिकीट दिलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेले पैलवान महेश लांडगेंनी बंडखोरी केली. तेंव्हा आघाडीत बिघाडी अन युतीत फूट झाल्याने इथून पंचरंगी लढत झाली. अन 2009च्या निकालाची पुनरावृत्ती होत अपक्ष उमेदवार महेश लांडगेंनी सर्वांना चितपट केलं. सत्तेची समीकरणं पाहत अपक्ष आमदार लांडगेंनी 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी घरोबा केला अन महापालिकेत सत्ता काबीज करण्यात मोलाचा वाटा उचलला.
भाजपची शहरात वाढणारी ताकद पाहून 2019च्या लोकसभा निवडणुकीत पैलवान आमदार लांडगेंनी शड्डू ठोकला. विद्यमान खासदार आढळरावांना चितपट करण्याचे मनसुबे आखणाऱ्या लांडगेंनी ऐनवेळी आपण निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. त्याला कारण ही तसंच होतं, ते म्हणजे शिवसेनेच्या गोठातून शरद पवारांनी अमोल कोल्हेंना फोडल्याचं. शिवबंधन तोडून मनगटी घड्याळ बांधलेल्या कोल्हेंनी एकहाती किल्ला लढवत आढळरावांचा त्रिफळा उडवला. पण भोसरी विधानसभेतून त्यांना मताधिक्य मिळवता आलं नाही. हीच बाब 2019च्या विधानसभेसाठी युती अर्थात भाजपला फायद्याची ठरणारी आहे. मात्र लांगडेंचं 'व्हिजन 2020' अद्याप ही कागदावर असल्यानं अन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात सुरु असलेलं 'कार्य' पाहता, मतदार काय विचार करतो हे पाहणं महत्वाचं राहील. त्यातच विलास लांडेंनी यंदा निवडणूक लढणार नसल्याचं तूर्तास तरी जाहीर केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता यांनी दत्ता सानेंनी लांडगेंचा पराभव करण्यासाठी 'शेंडी' वाढवलीये. पण ते शिवसेना किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
विद्यमान आमदार महेश लांडगे हेच इथून युतीचे उमेदवार असतील, पण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात कोण असेल? हे अद्याप ठरलेलं दिसेना. 2009 आणि 2014 साली मतदारांनी अपक्ष उमेदवाराला कल दिल्यानं त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये ही होईल, असा कयास काही इच्छुकांनी बांधलाय. त्यातच युतीत फूट झाल्यास अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. त्या घडामोडींवरच इथला आमदार कोण? हे स्पष्ट होईल.
2019च्या शिरूर लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं
शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 1 लाख 25 हजार 335
डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 88 हजार 259 (विजयी)
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान