मुंबई : आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली आहे.


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार?, अशा शब्दात पवार यांनी सरकारवर टीका केली.

निवडणुकीला सामोरे जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने करण्याचा विचार केला जाईल, असेही पवार म्हणाले.

राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचे हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. येत्या 20 तारखेला मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल यात शासनाने मदत केली तर ठीक, नाहीतर रस्त्यावर उतरण्याचे काम केले जाईल. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोकं विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मत करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचे आहे. यातून पक्षाला फायदा आहेच त्यासोबतच राज्याला देखील मोठा फायदा आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर हे आज गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. आपले मुख्यमंत्री हे तिथलेच. या साऱ्यांविरोधी आवाज उठवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत आज महिला कार्यकर्त्यांचा उत्तम निर्धार जाणवला असल्याचे देखील शरद पवार म्हणाले.