मुंबई : भाजपचं काँग्रेसीकरण सुरु असून फक्त आम्ही मोठी केलेली लोकं भाजप घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राजकारणात रेडिमेट कपड्यांऐवजी शिवून कपडे घेणारे लोक महत्त्वाचे असतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे शिवून घ्यावेत असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही मोठी केलेली लोकं भाजपमध्ये घेतली जात आहेत. मग त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.


पाटील म्हणाले की, महिला आघाडीचं कोणी गेलं असलं तरी त्याचा नगण्य परिणामही आमच्या पक्षावर झालेला नाही. आमचे सच्चे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. आमचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत, असेही ते म्हणाले. आघाडीची चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले. राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळं काही चर्चा रखडली होती, असे त्यांनी सांगितले. पण पुन्हा चर्चा करु, 288 जागांवर सर्वच चाचपणी करत आहोत.  आघाडी झाल्यावर आम्ही एकत्र काम करु, असेही ते म्हणाले.

शरद पवारांचं महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांचा विचार करू नका. पक्ष पुढे कसा घेऊन जायचा याचा विचार करा. जे पक्ष सोडून गेले आहे ते त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे गेले आहेत. आपल्या जोमानं काम करायचं आहे असे म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. नवनिर्वाचित महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.