स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. 2009 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण इथून निवडणूकीत उभ्या होत्या. मात्र यावेळेला त्यांच मताधिक्य वीस हजाराने घटलं होतं. या दरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते. त्यामुळे भोकर मतदारसंघात विकासाची गंगा यायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. कॉंग्रेसचं प्रदेशाध्यक्ष या काळात अशोक चव्हाण यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना भोकरकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळालाच नाही.


या सर्व घडामोडीत भोकरमध्ये अनेक स्वयंघोषित कारभारी तयार झाले. या कारभाऱ्यांनी मतदारसंघातील समस्या नेतृत्वाकडे जाऊच दिल्या नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. भोकर तालुका एकेकाळी सिंचनाने समृद्ध होता. इसापूर धरणाच्या पाण्यावर इथले शेतकरी ऊस, केळी आणि हळद अशी नगदी पिकं घेत असत. मात्र पैनगंगा नदीवर इसापूर धरणाच्या वरच्या बाजूला अनेक बंधारे झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून इथला सिंचनाचा विकास जवळपास खुंटला आहे.

सुधा प्रकल्पाचा अद्याप देखील विस्तार होऊ शकलेला नाही. त्याशिवाय भोकर मतदारसंघात सिंचनाच्या काही वेगळ्या सोयी इथल्या नेतृत्वाने तयार केल्याच नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ आता भकास होत चाललाय. अर्धापुरी केळीसाठी प्रसिद्ध असलेली केळी आता नामशेष होते की काय अशी भीती निर्माण झालीय. केळीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची नुसतीच चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात तिथं काहीही घडलेल नाही.

उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री देखील राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी भोकरमध्ये कोणतेच उद्योग आणले नाहीत. त्यामुळे बेकारी इथलीही कायमची समस्या आहे. त्याचबरोबर या मतदारसंघातील अंतर्गत रस्त्याच्या बाबतीत बोंबाबोंबच आहे. गेल्या काही दिवसात या मतदार संघातील अनेक स्थानिक स्वराज संस्थामध्ये कॉंग्रेसने अपहार केल्याचे आरोप गाजले. अशा स्थितीत कॉंग्रेस नेतृत्वाला ही जागा राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

भोकरमध्ये यावेळी कॉंग्रेसकडून अशोक चव्हाण स्वत: उमेदवार असणार आहेत. त्यामुळे सध्या अशोक चव्हाण पूर्णवेळ भोकरच्या मतदारसंघात व्यस्त आहेत. त्यांना भोकरमध्येच गुंतवून ठेवण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. भोकर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुतांश पुढाऱ्यांनी पक्षाला रामराम करत खासदार प्रताप पाटील यांची गळाभेट घेतली आहे. भाजपकडून इथं राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बापूसाहेब गोरठेकर यांना धर्मराज देशमुख, किशोर देशमुख यांच्यासह अनेक जनाधार असलेल्या नेत्यांचे पाठबळ मिळत आहे. भोकर, अर्धापूर आणि मुदखेडचे अनेक कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर देखील स्वत : भोकरकडे विशेष लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे भोकरची लढाई अशोक चव्हाण यांच्यासाठी सोप्पी नाही. भोकरमधून भाजपकडून बापूसाहेब गोरठेकर, नागनाथ घिसेवाड, सुरेश राठोड, प्रवीण गायकवाड, राम चौधरी आदी उत्सुक आहेत. शिवसेनेकडून उत्तम जाधव, धनराज पवार, बबन बारसे यांनीही उमेदवारी मागितली आहे. तर वंचित आघाडीकडून नामदेव आयलवाड, केशव मुद्देवाड यांच्यासह अन्य काही जण उत्सुक आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची विधानसभेत पुनरावृती होईल अशी आशा भाजपाला आहे. तर साखर कारखान्याच्या बळावर आणि वैयक्तिक अशोक चव्हाण यांच्याप्रती असलेल्या प्रेमावर कॉंग्रेसची भिस्त अवंलबून आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघात भोकर अर्धापूर आणि मुदखेड हे तीन तालुके येतात. तीनपैकी दोन तालुक्यात रेल्वेमार्ग उपलब्ध आहे. पण या तीनही तालुक्यातील लोकांचा रेल्वेफाटकाच्या कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला उभे राहून वेळ वाया जातो. नाही म्हणायला मुदखेड इथं रेल्वे उड्डाणपूल झाला पण तो शहराच्या फारसा वापरात नसलेल्या बाजूला बनवल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. भोकर इथं उड्डाणपुलाचं काम अनेक वर्षांपासून काम सुरु आहे. पण ते प्रत्यक्षात संपूर्ण लोकांना वापरण्यासाठी हा रेल्वे पूल कधी मिळेल याची अनेक वर्षांपासून प्रतिक्षा आहे. नांदेड जिल्हा मुख्यालयापासून भोकर तालुक्यात जो मुख्य राज्य मार्ग आहे त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हा रस्ता अनेक महिन्यांपासून फक्त प्रगतीपथावरच आहे. त्यामुळे भोकर तालुक्यातील जनतेचे मोठे हाल होत आहेत.