भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेला हा भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे रामचंद्र अवसरे हे तब्बल ३६ हजार मतांनी निवडून आले. भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणे नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदार संघात ४८% मतदार ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे उमेदवाराला आपल्या समाजासोबतच इतर समाजासोबत मिळून मिसळून वागणं महत्वाचं असतं. तर भंडारा जिल्ह्यातील इतर दोन मतदार संघाच्या तुलनेत या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट तसेच भाजप संघटन मजबूत असल्याने आमदार रामचंद्र अवसरे हे सहज निवडून आले.
या मतदार संघात 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे निवडून आले होते, आता ही जागा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळावी म्हणून माजी आमदार नरेंद्र भोंडेकर कसोशीने प्रयत्न करत आहेत, त्यामुळे ही जागा कुणाच्या पदरात पडते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
बसपाची महत्वाची भूमिका
भंडारा विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलयाने बसपाची भूमिका या ठिकाणी महत्वाची ठरते. २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे इतर पक्षांना बसपाच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
गोसेखुर्द प्रकल्प कळीचा मुद्दा
गेल्या कित्येक वर्षांपासून पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरण आणि प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न निवडणुकीतला कळीचा मुद्दा बनतो. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या प्रकल्पाला दिला आहे, मात्र आजही सातत्याने हा प्रकल्प आणि प्रकल्पबाधितांचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत. हा कळीचा मुद्दा राज्य सरकार येत्या काळात कसा सोडवतं, याकडे कशा पद्धतीने लक्ष देते या कडे या जिल्ह्यातील मतदारांचं लक्ष लागलंय.
तसंच पवनी तालुक्यातील ४०% भाग हा उमरेड पवनी करंडला या अभयारण्यात येत असल्यामुळे या अभयारण्यालगत असलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही रखडलेला आहे, सोबतच या गावांलगत असलेल्या स्थनिकांना या ठिकाणीच रोजगार मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवक प्रयत्न करत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने बाजी मारली. आता भंडारा-गोंदियाचे बडे नेते असलेले प्रफुल पटेल आणि माजी खासदार नाना पटोले किती विधानसभा मतदारसंघ खेचून आणतात, हे पाहणंही उत्सुकतेचं आहे.