जालना : गुप्तधनाच्या लालसेपोटी एका विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड मधल्या दह्याळा गावात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशीच घडला असल्याची माहिती देत पीडित महिलेने काल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून हा गुन्हा दाखल केला आहे.

सदर महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू सासरे आणि घरातील इतर सदस्यांनी या विवाहितेला पौर्णिमेचा मुहूर्त साधून गावातील शेतात विवस्त्र करून झाडाला बांधून अंघोळ घातली. या नंतर हवन पेटवून पूजा करत महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिलेने जोरदार विरोध केल्याने आणि पूजेचा मुहूर्त टळल्याने या महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर तिला घरात दोन दिवस डांबून ठेवले.

पीडितेने आरोपांच्या ताब्यातून कशीबशी आपली सुटका करून घेतली. घडलेल्या घटनेची माहिती माहेरच्या नातेवाईकांना सांगताच आज रोजी गोंदी पोलीस स्टेशन गाठून पती, सासू सासरा, मामा सासरा, नणंद, दीर यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र नरबळी अमानूष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचे उच्चाटन तिबंधित  कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसआय सय्यद नसीर हे करीत आहेत.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात पूजेचे साहित्य जप्त केले असून महिलेच्या पती सह सासरच्या सहा जणांविरोधात विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत.