बीड : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढत होते तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. पूर्वी हाच मतदार संघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. याच मतदारसंघांमध्ये गत आठ निवडणुकांमध्ये एकदा अपवाद वगळता सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे म्हणूनच हा मतदारसंघ म्हणजे भाजपाचा गड मानला जातो.
पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे हे पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. 1985 ला एकदा मात्र पंडितराव दौंड यांच्यासमोर गोपीनाथ मुंडेंना हार पत्करावी लागली होती. 2009 मध्ये पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. त्यावेळेपासून दोन वेळा या मतदारसंघातून पंकजा मुंडे या आमदार झाल्या आहेत.
2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. यावेळी पंकजा मुंडे या पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या प्रा. टी. पी. मुंडे यांचा पराभव करत विजय मिळवला.
2009 च्या विधानसभा निवडणुकीपासूनच धनंजय मुंडेंची नाराजी
2009 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभा लढवण्याच्या तयारीत होते. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांना संधी मिळाली आणि धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यात आलं. पण इथून सुरू झालेल्या नाराजी नाट्याचा प्रवास थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशापर्यंत येऊनच थांबला.
2010 ते 2012 या दरम्यान धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मध्ये अनेक विषयावरून मतभेद निर्माण झाले आणि शेवटी जानेवारी 2012 मध्ये परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून धनंजय मुंडेंनी बंड केलं. त्यानंतर 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीआधी गोपीनाथ मुंडे यांचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी 26 हजार 184 मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. खरं तर या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर तयार झालेल्या सहानुभूतीमुळे पंकजा मुंडे पुन्हा विधानसभेत गेल्या.
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मुंडे यांचा वारसा पुढे कोण चालवणार याविषयी सुद्धा बरीच चर्चा झाली मात्र पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांचा समर्थ वारसा सांभाळत आपल्या वडिलांची म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची राजकीय कारकीर्द पुढे नेत होत्या. आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर दोन निवडणुका होत्या. त्यातली एक म्हणजे वैद्यनाथ सहकारी बँक आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना या दोन्ही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशीच सरळ लढत झाली. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय वर मात करत दोन्ही सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं.
परळी जि.प, नगरपालिकेत धनुभाऊंचा दबदबा
खरंतर यानंतर केवळ परळी विधानसभा मतदारसंघातीलच नाही तर जिल्ह्यातील कोणत्याही छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच सामना होत राहिला. यानंतर मोठी निवडणूक झाली ती म्हणजे 2016 मध्ये परळी नगरपालिकेची. या निवडणुकीमध्ये एकूण 33 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक धनंजय मुंडे यांच्या गटाचे निवडून आले. धनंजय मुंडे यांनी नगरपालिकेवर एक हाती वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीतील यशानंतर खरंतर धनंजय मुंडे यांचं परळी शहरातील राजकीय वजन वाढताना पाहायला मिळत होते.
राज्यात कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना स्वतःच्या मतदारसंघातील स्वतःचे शहर सांभाळता आलं नाही याची चर्चा मात्र खूप झाली. इतिहासात आठ पैकी सात वेळा या मतदारसंघांमध्ये भाजपला विजय मिळाला त्याच भाजपकडे परळी शहरातील सत्ता मात्र अपवादानेच राहिली.
यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि यात सुद्धा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला. कारण 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून फक्त एकच जिल्हा परिषद सदस्य भाजपला निवडून आणता आला. विशेष म्हणजे परळी तालुक्यातील सर्व सहा जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंला मोठी धोबीपछाड दिली.
खरतर भाऊबंदकी मधला हा संघर्ष केवळ एका विधानसभा मतदारसंघा पुरता मर्यादित राहिला नाही. ज्यावेळी धनंजय मुंडे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर तर सभागृहामध्ये अनेक वेळा धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना अनेकदा रंगताना पाहायला मिळाला आहे. मोठ्या संघर्षानंतर धनंजय मुंडे यांनी जसे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले बस्तान बसवले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना राज्यभर आपल्या कामाची चमक दाखवली. म्हणूनच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे स्टार प्रचारक म्हणून प्रचार करत होते..
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशीच निवडणूक झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण या निवडणुकीमध्ये तब्बल एक लाख 72 हजार मतांनी प्रीतम मुंडे यांचा विजय झाला. याच लोकसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपला 19 हजार मतांचा लीड मिळाला.
राज्याचा ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याण मंत्री पद सांभाळत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यासाठी मोठा विकास निधी आणला. यात सर्वात मोठे लक्षात राहणारे काम म्हणजे जिल्ह्यातील रस्त्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी आणला. यात परळी विधानसभा मतदारसंघातील गावात शासकीय इमारती रस्ते यांची कामे झाली आणि याच विकास कामावरती पुन्हा एकदा पंकजा मुंडे या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव करत 25000 मतांची आघाडी मिळवली होती. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना रंगणार आहे.
परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 10:06 AM (IST)
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव करत 25000 मतांची आघाडी मिळवली होती. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा विरुद्ध धनंजय असाच सामना रंगणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -