नवी दिल्ली : अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनला ठार केल्याचं वृत्त समोर येत आहे. एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, दहशतवादी कृत्य करणाऱ्या हमजा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला आहे.


मात्र हमजाला कधी मारलं आणि कुठे मारलं याबाबत कोणतीही माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी रिपोर्टमध्ये दिलेली नाही. अमेरिकेने 2017 मध्ये जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हमजा लादेनचंही नाव होतं.


एनबीसीने याबाबत अधिक माहितीसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यांच्या संपर्क साधला. मात्र ट्रम्प यांनी हमजाला ठार केल्याच्या वृत्ताला नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही. याबाबत कोणतंही वक्तव्य देण्यास त्यांनी नकार दिला.


हमजाला आपल्या वडिलांच्या म्हणजे ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी तो अमेरिकेवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होता. यापार्श्वभूमीवर हमाजाची माहिती देणाऱ्यास अमेरिकेने दहा लाख डॉलरचं बक्षिसही जाहीर केलं होतं. मे 2011 मध्ये अमेरिकेच्या सील कंमाडोंनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता.


ओसामा बिन लादेनची एकूण 20 मुलं आहेत, त्यापैकी हमजा 15 वा मुलगा आहे. ओसामा बिन लादेन प्रमाणे हमजा देखील इतर देशांना दहशतवादी हल्ल्याची धमकी देत होता.


हमजा दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे. लादेनच्या मृत्यूनंतर अल-कायदाची सूत्रे हाती घेतलेल्या अल जवाहिरीनंतर हमजाचंच वर्चस्व होतं. मृत्यूआधी ओसामा बिन लादेन हमजाला आपला उत्तराधिकारी बनवण्याची तयारी करत होता. लादेनचा खात्मा केला त्यावेळी मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली होती.