मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अभ्याक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली आहे. आज जाहीर झालेल्या यूजीसीच्या यावर्षीच्या दुसऱ्या यादीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.


आयडॉलच्या 15 अभ्याक्रमास 2019-20 साठी युजीसीने मान्यता दिली आहे. त्यामुळे 35 ते 40 हजार विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरु करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.


यानुसार प्रथम वर्ष व व्दितीय वर्ष बीए, बी.कॉम, बी.एस्सी आयटी व पदव्युत्तर एम.ए., एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.कॉम, एम.एस्सी. गणित, एम.एस्सी. आयटी व एमसीए अशा एकूण 15 अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरु होत आहेत. याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच एमसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल.


यूजीसीने भारतातील दूर व मुक्त शिक्षणासाठी 2017 साली नवीन नियमावली लागू केली. या नियमावलीनुसार भारतातील दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या संस्थासाठी 'नॅक' असणे अनिवार्य केले होते. मुंबई विद्यापीठाबरोबरच भारतातील अनेक विद्यापीठे 'नॅक'ची कार्यवाही करत असल्याने व प्रथमच दूरशिक्षणासाठी ही नियमावली लागू केल्याने यूजीसीने या नियमावलीत बदल केला. 'नॅक'ची अट दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापीठासाठी शिथील करण्यात आली.


मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेची पाहणी करण्यासाठी यूजीसीने तज्ज्ञ समितीची स्थापना केली. या तज्ज्ञ समितीने मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलला भेट देऊन पाहणी केली. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाशी चर्चा केली आणि आपला अहवाल यूजीसीला सादर केला.


याच दरम्यान यूजीसीने 27 जुन रोजी 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या मान्यतेची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाचे नाव समाविष्ठ नव्हते. कारण या यादीमध्ये यापूर्वी पाहणी झालेल्या इतर संस्थांची नावे यात समाविष्ट होती. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नाव या दुसऱ्या यादीमध्ये समाविष्ठ झाल्याने आयडॉलच्या 15 अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु करण्याचा मार्ग खुला झाला आहे.


मान्यत मिळालेले अभ्यासक्रम




  • बीए

  • बी.कॉम

  • बी.एस्सी आयटी

  • एमए - इतिहास

  • एमए - समाजशास्त्र

  • एमए - अर्थशास्त्र

  • एमए - राज्यशास्त्र

  • एमए - मराठी

  • एमए - हिंदी

  • एमए - इंग्रजी

  • एम.ए. शिक्षणशास्त्र

  • एम.कॉम

  • एम.एस्सी. गणित

  • एम.एस्सी. आयटी

  • एमसीए