इतिहासात मागच्या चाळीस वर्षात गेवराई विधानसभा मतदारसंघावर पंडित घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. मागच्या चाळीस वर्षात पवार घराण्याचा अपवाद वगळला तर या विधानसभा मतदारसंघावर ती सर्वाधिक काळ पंडित घराण्याची सत्ता राहिली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादीच्या बदामराव पंडित यांचा पराभव केला होता.
चुलते पुतणे एकत्र आले तरीही साठ हजार मतांनी झाला पराभव
2014 ची विधानसभा निवडणूक ही गेवराईच्या पंडित घराण्यातील राजकारणासाठी वेगळी होती. कारण इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पंडित चुलते-पुतणे एकत्र आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बदामराव पंडित हे उमेदवार होते आणि अमरसिंह पंडित हेही राष्ट्रवादीमध्ये असल्या कारणाने त्यांनी चुलते बदमराव पंडितांचा प्रचार केला. खरंतर गेवराईच्या इतिहासामध्ये बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित हे कडवे विरोधक म्हणून ओळखले जायचे. मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही पंडित एकत्र आले तरीही भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा तब्बल 60 हजार मतांनी पराभव केला होता.
हे ही वाचा - आष्टी विधानसभा मतदारसंघ : भाजपची ताकद वाढली पण तिकीट मिळणार कुणाला?
बदामराव पंडित तीनदा आमदार
गेवराईच्या राजकारणामध्ये सर्वाधिक आमदार राहण्याचा मान हा बदमराव पंडित यांना मिळतो. खरंतर गेवराई विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत पंडित घराण्याभोवतीच राजकारण फिरताना पाहायला मिळतं. बदामराव पंडित हे तीन वेळा गेवराई विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. यातील पाच वर्ष युती शासनाच्या काळात ते राज्यमंत्री सुद्धा राहिले होते.
शिवाजीराव पंडित तीन टर्म आमदार
बदामराव पंडित यांच्यानंतर तीन टर्म आमदार म्हणून निवडून आले ते शिवाजीराव पंडित. शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित हे चुलत भाऊ आहेत. 1978 ते 1995 पर्यंत शिवाजीराव पंडित हे या मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून गेले. यातील साडेचार वर्ष त्यांनी राज्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात काम पाहिले होते. 1995 नंतर मात्र शिवाजीराव पंडित हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले आणि त्यांच्यानंतर अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
हे देखील वाचा -बीड विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या संघर्षात कोण बाजी मारणार?
पवार कुटुंबात तीन पिढ्यात तीनदा आमदारकी
गेवराईच्या राजकारणामध्ये पंडित कुटुंबियांसमोर पवार कुटुंबियांनी आव्हान उभं केलं होतं. मागच्या पन्नास वर्षात पवार कुटुंबातील तीन पिढ्यात तीनदा आमदारकी आली. यात सर्वात आधी शाहूराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून आमदारकी मिळवली. त्यानंतरच्या काळामध्ये माधवराव पवार यांनी सुद्धा शिवाजीराव पंडित यांचा पराभव केला होता आणि आता विद्यमान आमदार असलेल्या लक्ष्मण पवार यांनी बदामराव पंडित यांचा पराभव केला होता. सध्या भाजपकडून आमदार झालेल्या लक्ष्मण पवार यांचे माधवराव पवार हे वडील होते. तर शाहूराव पवार हे त्यांचे आजोबा होते. खरंतर पवार कुटुंबामध्ये लक्ष्मण पवार यांचे आजोबा एकदा त्यानंतर वडील एकदा आणि स्वतः लक्ष्मण पवार हे एकदाच आमदार झालेत. म्हणून येणाऱ्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लक्ष्मण पवार हा इतिहास बदलतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे ही वाचा- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
अमरसिंह पंडितांच्या राजकीय प्रवेशानंतर पंडित कुटुंबातील लढत बनली तीव्र
अमरसिंह पंडित यांच्या राजकीय प्रवेशापूर्वी पंडित कुटुंब अभेद्य होते. अमरसिंह पंडित यांनी सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी बदामराव पंडित हे चुलत भाऊ असलेल्या शिवाजीराव पंडित यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. मात्र 1992 च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अमरसिंह पंडित आणि बदामराव पंडित दोघेही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. या निवडणुकीमध्ये बदामराव आणि अमरसिंह पंडित दोघेही सदस्य म्हणून निवडून आले खरे, मात्र या दोघांपैकी गेवराई पंचायत समितीचे सभापती कोणाला करायचं यावर नाराजी नाट्य सुरू झालं आणि बदामराव पंडित हे शिवाजीराव पंडित यांच्यापासून दुरावले. खरंतर अमरसिंह पंडित यांच्या राजकीय प्रवेशापूर्वी पंडित विरुद्ध पवार असा वाद होता मात्र अमरसिंह पंडित यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशा नंतर पंडित घरातच कुरघोडीचे राजकारण घडू लागले.
बदमराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित
1995 नंतर मात्र पंडित कुटुंबातील नवीन पिढी राजकारणात आली. शिवाजीराव पंडित हे राजकारणापासून अलिप्त होत होते. तर त्यांच्या ठिकाणी अमरसिंह पंडित हे राजकारणामध्ये एक पाऊल पुढे टाकत होते. याच काळात बदामराव पंडित हे पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. आता मात्र गेवराईच्या राजकीय इतिहासामध्ये चुलता विरुद्ध पुतण्या नवीन लढत निर्माण झाली होती. 1999 ते 2009 या काळात तीन विधानसभा निवडणुकीमध्ये बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित अशीच लढत झाली यात अमरसिंह पंडित एकदाच भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अमरसिंह पंडित हे दोनदा आमदार झाले त्यात एकदा गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडून आले तर एकदा विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडले गेले.
हे देखील वाचा - केज विधानसभा | मुंदडांचा वारसा पुढे नेणार का? लढतीकडे राज्याचे लक्ष
लोकसभा निवडणुकीत भाजपला 34 हजार मताचे मताधिक्य
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना 34 हजार 650 मतांची आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-सेनेची युती असल्या कारणाने शिवसेनेकडून बदामराव पंडित आणि भाजपकडून लक्ष्मण पवार या दोघांनीही ताकत लावली आणि म्हणून भाजपच्या प्रीतम मुंडे यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून 34 हजार मतांची आघाडी मिळाली.
पंकजा मुंडेची भूमिका निर्णायक
गेवराई विधानसभा मतदारसंघावरती पंकजा मुंडे यांची मजबूत पकड असल्याचं यापूर्वीच म्हणजे मागच्या विधानसभा आणि आता काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतून समोर आलंय. सध्याचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हे पंकजा मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. म्हणूनच गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे किती ताकद लावतात यावर या विधानसभा मतदारसंघाची लढत ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी गेवराईत येऊन पंडित मुक्त गेवराईचा नारा दिला होता. यावरून पंकजा मुंडे यांचे कडवे विरोधक मानले जाणारे अमरसिंह पंडित यांच्याविरोधात पंकजा मुंडे या लक्ष्मण पवारांना किती बळ देतात यावरच गेवराई विधानसभा मतदार संघाचे लढत ठरणार आहे.
लक्ष्मण पवार यांनी विकास निधी खेचून आणला
गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या वाळूच्या उपशामुळे गेवराई विधानसभा मतदार संघातील रस्त्याची मात्र अक्षरशः चाळण झाली होती. मात्र भाजपकडून आमदार बनलेल्या लक्ष्मण पवार यांनी या विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 209 कोटींचा निधी आणला होता. यामुळे तुलनेने मतदारसंघातील रस्त्यांची परिस्थिती बरी झाली आहे. विशेष म्हणजे राक्षसभुवनकडे जाणारा प्रलंबित रस्ता पवारांच्या काळात मार्गी लागला. यासोबतच गेवराई शहरांमध्ये शहरांतर्गत रस्ते, नाल्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत.
या विकास कामांचे काय ?
2014 नंतर लक्ष्मण पवार यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये काही प्रश्न मार्गी लावले असले तरीही आणखीही विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे या विधानसभा मतदारसंघांमध्ये गत पाच वर्षात कोणताही उद्योग आला नाही एमआयडीसीचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहिले. यासोबतच दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना मतदारसंघातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. यासोबतच तीर्थक्षेत्र असलेल्या राक्षसभुवन आणि त्वरिता देवी यांचा सुद्धा विकास गत पाच वर्षांमध्ये झालेला नाही.
तिरंगी लढत होणार
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या बदामराव पंडित यांचा भाजपच्या लक्ष्मण पवार यांनी पराभव केला. त्यानंतर बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी देण्याच्या अटीवरच बदामराव पंडित यांनी सेनेमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. आगामी काळात गेवराई विधानसभा मतदारसंघांची जागा कुणाला सुटते यावरच या मतदारसंघातील लढत होणार आहे. जर युती झाली तर मग गेवराई विधानसभा मतदारसंघाची जागा परंपरेप्रमाणे भाजपकडे आली तर बदामराव पंडित मात्र अपक्ष निवडणूक लढवू शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून विजयसिंह पंडित हे निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. म्हणजे जर भाजपा सेनेमध्ये युती नाही झाली तर मग मात्र सेनेकडून बदामराव पंडित भाजपकडून लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित अशी तिरंगी लढत गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळू शकते.