सोलापूर : महाविकास आघाडीतील शिवसेना युबीटी पक्षाच्या 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. त्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip sopal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाकरेंच्या पहिल्याच यादीत दिलीप सोपल यांचे तिकीट जाहीर झाल्यामुळे मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाती मशाल घेऊन जल्लोष सुरू केला आहे. तर, दुसरीकडे विद्यमान अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचे तिकीट भाजपच्या पहिल्या यादीत जाहीर न झाल्याने मतदारसंघातील सर्वांची उत्सुकता ताणली आहे. तर शिवसेना (Shivsena) शिंदेंच्या यादीतही बार्शी मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला नव्हता. त्यातच, आता महायुतीकडून बार्शीत शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी असा सामना होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. 


बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिलीप सोपल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही चर्चा आणखी जोमाने होत आहे. दरम्यान, राजेंद्र राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच मी भाजपचा उमेदवार असेल, असे स्पष्ट केले होते. तसेच, मधल्या काळात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट होते. मात्र, आमदार राऊत यांनी मनोज जरांगेंसोबत थेट घेतलेला पंगा आणि भाजपविरुद्ध मुस्लीम मतदारांची नाराजी पाहता त्यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्यात येत असल्याचे समजते. तसेच, शिवसेनेचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या सोलापूर मध्य इथून भाजप लढणार असून बार्शीतून भाजपऐवजी शिवसेना शिंदे गट लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  


सोलापूर भाजपला, बार्शी शिवसेनेला


लोकसभा निवडणुकीत सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदेना केवळ 796 मतांचे मताधिक्य आहे, त्यामुळे या मतदारसंघात भाजप निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. तर, राजेंद्र राऊत यांनी गत 2019 च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यामुळे, बार्शीत राऊत यांना भाजपऐवजी शिवसेनेतून लढवण्यासाठी महायुतीत चर्चा सुरू आहे. 


ठाकरेंच्या पहिल्या यादीत दिलीप सोपल


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, बार्शी विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंनी मुरब्बी व अनुभवी नेत्याला संधी दिली. माजी मंत्री दिलीप सोपल यांना ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं, बार्शीत पुन्हा दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत अशी पारंपारीक लढत पाहायला मिळणार आहे. गत निवडणुकीत दिलीप सोपल यांचा साधारण 3 हजारांच्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे, यंदा येथील लढत काँटे की टक्कर मानली जातेय.   


हेही वाचा


ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात