Maharashtra Politics मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला होईल, असे सांगितले जात आहे. तर त्यानंतर मंत्रीमंडळाचा ही विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या लाडक्या नेत्याला एखादे कॅबिनेट, मंत्रीमंडळात स्थान किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी अगदी उच्चपदस्थ नेत्यांपासून देवापर्यंत साकडे घातले जात आहे. हे थोडं की काय आता भावी मंत्री म्हणून राज्यभरात अनेक नेत्यांचे बॅनर हे चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडेल हे येणारा काळ ठरवेल. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षवेधी ठरत आहे.
रावसाहेब दानवे यांच्यासाठी तरुणाने लिहिले चक्क रक्ताने पंतप्रधानांना पत्र
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी करत एका तरुणाने चक्क रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. जालन्यातील दरेगाव येथील कृष्णा गायके या तरुणाने रावसाहेब दानवे भाजपचे जेष्ठ नेते आहेत. ते पाच टर्म खासदार राहिलेले असून त्यांना मुख्यमंत्री करावं, अशी मागणी या तरुणांनी पत्राद्वारे केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळून देखील आजपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांची नावे सुचवली जात आहेत. अशातच जालन्यातील दरेगाव गावातील कृष्णा गायके या तरुणाने आपली भावना व्यक्त करत विनंती केली आहे.
आदिती तटकरे यांचे भावी मंत्री?
रायगडच्या रोहा शहरामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांचे भावी मंत्री म्हणून रोहा शहरांत बॅनर झळकले आहेत. कार्यकर्त्यांनी अदिती तटकरे यांना भावी मंत्री म्हणून अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत
पराभवनंतर यशोमती ठाकूर यांचे आभाराचे
काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या माजीमंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदार संघात भाजपच्या राजेश वानखडे यांच्या कडून पराभव झाला. यानंतर यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदार संघातील सर्व गावात आभाराचे बॅनर लावले. या बॅनरच्या माध्यमातून यशोमती ठाकूर यांनी मतदारांना भावनिक साद घालत सदैव जनतेच्या सेवेस तत्पर असल्याचं म्हटलं तसेच कालचा दिवस आपला नव्हता पण भविष्य आपलेच असेल असा मजकूर यात लिहिला आहे.
रवी राणा 'भावी कॅबिनेट मंत्री'
तर दुसरीकडे जिल्ह्यात महायुतीच्या दणदणीत विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा थेट 'भावी कॅबिनेट मंत्री' असा उल्लेख करत शहरात बॅनर लावले. आमदार रवी राणा हेच 'बॉस' आणी ' पर्मनंट आमदार ' असल्याचही काही बॅनर मधून व्यक्त कारण्यात आलं आहे. यशोमती ठाकूर यांनी येणार दिवस आपलाच असेल अशी आशा व्यक्त केली आहे तर आमदार राणा यांचे कार्यकर्ते त्यांना कॅबिनेट मंत्री बनलेलं बघण्यासाठी उत्सुक आहेत. भविष्यात काय घडेल हे वेळच ठरवेल मात्र, चौका-चौकात लावण्यात आलेल्या या बॅनर-पोस्टरची नागरिकांमध्ये मात्र चांगलीच चर्चा होत आहे..
आमदार देवयानी फरांदे यांचे भावी पालकमंत्री असे अशयाचे लागले बॅनर
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे नाशिकमध्ये देवयानी फरांदे या नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. देवयानी फरांदे यांचे नाव राज्याच्या महिला मंत्र्यांचे यादीत देखील चर्चेत आहे त्यामुळे थेट भावी पालकमंत्री असे आमचे बॅनर देवयानी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक शहरात लावण्यात आले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन छगन भुजबळ दादा भुसे यांचे नाव चर्चेत असताना आता देवयानी फरांदे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असताना देवयानी फरांदे यांचे भावी पालकमंत्री असे आशयाचे बॅनर आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
रक्ताने पत्र लिहत भावना गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी
25 वर्ष खासदार राहीलेल्या अपराजित खासदार भावना गवळी ह्या लाडक्या बहिणीला मंत्रिपद देऊन विदर्भाला न्याय द्यावा अशी मागणी रिसोड शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी खानझोडे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या रक्ताने लिहून केली आहे.
हे ही वाचा