मुंबई : काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिलं आणि नंतर प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून दिलं असा आरोप जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होतं त्या पद्धतीने लढलं नाही, आम्हाला पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही असा आरोपही कैलास गोरंट्याल यांनी केला. जालना मतदारसंघात काँग्रेसच्याच काही लोकांनी गद्दारी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जालना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांनी त्यांचा पराभव केला आहे.
अदानींनी पैसे दिल्याचं कानावर
शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला 40 ते 50 कोटी रुपये पार्टीने दिले. आदानींनी धारावी झोपडपट्टीचे काम मिळायला पाहिजे म्हणून त्यांना हे पैसे दिल्याचा आपण ऐकलं असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं.जालना मतदारसंघात विरोधकांनी सरासरी दीड लाख लोकांना पैसे वाटले. त्यामुळे हा भाजपचा, शिवसेनेचा विजय नाही तर हा पैशाचा विजय असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसने एकही सभा घेतली नाही
काँग्रेसने एकही सभा घेतली नाही. जी काही सामग्री द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. वरून पक्षातल्या काही लोकांनी गद्दारी केली. त्यांची आपण वरिष्ठ पातळीवर तक्रार केली आहे असं कैलास गोरंट्याल म्हणाले.
विरोधकांनी धार्मिक ध्रुवीकरण केल्याचं दिसून आलं. त्यामुळे हिंदूंमध्ये भिती निर्माण झाली आणि विरोधकांना त्याचा फायदा झाला. त्याचवेळी काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक मात्र विभागली गेली. त्यामुळे आपला पराभव झाल्याचं कैलास गोरंट्याल म्हणाले.