सोलापूर : एकीकडे राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व नेते EVM मशीनवर आक्षेप घेत असताना माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. मात्र यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे.
या निवेदनात मौजे मारकडवाडीमधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी केली आहे. यात गावात यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
मारकडवाडी ग्रामस्थांनी उचललं मोठं पाऊल
बॅलेटवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने शरद पवार गटाला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र निवडणूक निकाल येताच जानकर हे केवळ 13 हजार मताच्या फरकाने शेवटच्या टप्प्यात विजयी झाल्याने जानकर समर्थकांना मशीनवर विश्वास नसल्याची भावना तयार झाली आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडीचे नेते मशीनवर शंका उपस्थित करू लागल्याने मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून ज्या गावाने थेट आता बॅलेटवर मतदान घेण्याचे पाऊल उचलले आहे.
3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान
आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का? हा प्रश्न असून या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्याने दुसरा गट आता काय भूमिका घेणार? हे मतदानादिवशी पाहायला मिळणार आहे. या मतदान प्रक्रियेस शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांकडून ही मतदान प्रक्रिया पार पाडायची तयारी ठेवली आहे. यासाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून लगेच चारनंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. फेरमतदानाची मागणी संपूर्ण गावाने एकमुखी केली असती तर यातून काहीतरी फलित समोर आले असते. मात्र केवळ कमी मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने केलेल्या या प्रयोगास गावातील विरोधी गट सहकार्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा