नाशिक : संपूर्ण राज्यात तापमानाचा (Temperature) पारा खाली येत असून नाशिक (Nashik) शहरात देखील तापमानात घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात नाशिकचा पारा 2 अंशांनी तर निफाडचा (Niphad) पारा 3 अशांनी घसरला आहे. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले असून नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी किमान 10.6 तर कमाल 27.5 तापमानाची नोंद करण्यात आली. तर शनिवारी नाशिकचा पारा 8.9 अंशावर पोहोचला आहे. तर निफाडमध्ये किमान 7 अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद दोन दिवसांपासून होत असून जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी थंडीच्या लाटेची (Cold Wave) (येलो अलर्ट) शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविला आहे.


नाशिक जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वात निश्चित रूमनाची नोंद आज करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात नाशिकचा पारा दोन अंशाने घसरला आहे. 10. 6 अंशावरून 8.9 अंशावर पारा घसरला आहे तर निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअस वरून 7 अंशावर आला आहे. ओझर मधील तापमान 6.6 अंशावर गेल्यानं नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे मात्र नाशिककर या थंडीचा मनमुराद आनंद घेत आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने गोदा काठावरील भाविकांची संख्या रोजच्या मानाने थंडावली असली तरी गोदाकाठावरील मंदिर आणि छोट्या पुलावर धुक्याची चादर बघायला मिळत आहे.


थंडीच्या लाटेचा इशारा


नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 24 तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. नाशिक शहरात शुक्रवारी किमान 10.6 तर कमाल 27.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. गुरुवारी किमान 10.5, तर कमाल 27.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान 10.6, तर कमाल 27.5 अंश सेल्सिअस तापमान, तर मंगळवारी किमान 10.8, आणि कमाल 28.1 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  


हिंगोली, दापोलीत हुडहुडी 


दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात देखील थंडीची लाट पसरली असून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. हिंगोलीत अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या असून उबदार कपड्यांची मागणी सुद्धा वाढलेली आहे. या थंडीचा सर्वाधिक फटका हा शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना बसताना पाहायला मिळतोय. कडाक्याच्या थंडीतच शाळकरी मुलांना शाळेत जावं लागत असल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसात पारा 9 अंशावर आल्यामुळे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीत कडाक्याची थंडी जाणवत आहे.  


आणखी वाचा 


Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी वाढली! पुण्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी, तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता