Bacchu Kadu On Rajya Sabha Election : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर झालेल्या पराभवावरुन अपक्ष आमदारांवर खापर फोडले. त्यांनी सहा आमदारांची नावं देखील घेतली. यावरुन काही अपक्ष आमदारांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. सोबतच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील राऊतांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. 


बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की,  रिस्क न घेता आपापल्या उमेदवाराला जास्त मतं टाकण्याच्या नादात महाविकास आघाडीचा गेम बिघडला असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. सोबतच पूर्णतः अपक्षांना बदनाम करून नाही चालणार, काही अपक्ष सोबतही होते. अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार जो आघाडीसोबत आहे तो देखील या घोडेबाजारात सहभागी आहे, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.


बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, एकंदरीत आठ ते नऊ मत कमी पडली, संजय राऊतांना 41 मतांवर ठेऊन शिवसेनेने रिस्क घेतली, मात्र इतर पक्षाने तसं केलं नाही. त्यामुळे हा निकाल आला. ज्या आमदाराचं सभासदत्व कायम आहे. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही, हा कोर्टाचा निकाल अनाकलनीय आहे, असंही ते म्हणाले. 


बच्चू कडू म्हणाले की, घोडेबाजार किंवा इतर कुठला दबाव जसं ईडी किंवा सीबीआयमुळं अपक्षांवर दबाव असू शकतो. कुणालाही जबाबदार ठरवण्यापेक्षा प्रत्येकाने समजून घेण्याचा हा भाग आहे, पक्षांनी थोडा रिस्क घेतली असती तर चित्र वेगळं असतं, असंही ते म्हणाले. हे चित्र कायम राहील असं नाही, विधान परिषदेत चित्र बदलू शकते, सरकारवर काही परिणाम होणार नाही, असं ते म्हणाले. 


बच्चू कडू यांनी म्हटलं की, समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे,हे मोजता येत नाही, त्यांच्या कौतुकामध्ये एक वेगळा डाव असू शकतो,असं बच्चू कडू म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


BJP Task Force : अचूक नियोजन, मतांची आकडेमोड अन् चतुराई... भाजपच्या टास्क फोर्सने कसं काम केलं?


देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण...'