Akola Zp election : अकोला जिल्हा परिषदेवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने सत्ता राखली आहे. अध्यक्षपदी वंचित बहूजन आघाडीच्या संगीता अढाऊ विजयी झाल्या आहेत. त्यांनी  महाविकास आघाडीच्या उमेदवार किरण मोहोड यांचा 25 विरूद्ध 23 मतांनी पराभव केला आहे. अढाऊ या तेल्हारा तालूक्यातील तळेगाव बाजार मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यावेळी भाजपचे पाच सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिल्याने वंचितच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला.  उपाध्यक्षपदी वंचितचे सुनील फाटकर विजयी झालेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सम्राट डोंगरदिवे यांचा 25 विरूद्ध 23 मतांनी पराभव केला. फाटकर पातूर तालूक्यातील शिर्ला मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेवर प्रकाश आंबेडकरांची सत्ता आहे. 53 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत आंबेडकरांकडे 25 सदस्य आहे. तर महाविकास आघाडीकडे 23 सदस्य आहेत. 


अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर वंचितचा 'झेंडा' 


अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. दोन्ही पदांसाठी वंचित आणि महाविकास आघाडीत काट्याची टक्कर झाली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय शह-काटशहांनी आजच्या निवडणुकीत चांगलेच रंग भरले. मात्र, सरतेशेवटी या सर्वांवर प्रकाश आंबेडकर भारी ठरले. अकोला जिल्हा परिषदेत कुणालाच बहूमत मिळालं नाही.  53 सदस्यांच्या अकोला जिल्हा परिषदेत वंचितकडे दोन सहयोगी अपक्षांसह 25 सदस्य आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि दोन अपक्षांसह महाविकास आघाडीकडे 23 सदस्य आहेत. आजच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध राहिली. मात्र, भाजपनं मतदानावर बहिष्कार टाकल्यानं महाविकास आघाडीचं सत्तेचं स्वप्नं भंगल. नऊ महिन्यांपूर्वी दोन सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला पाठींबा दिल्यानं दोन्ही सभापती पदांवर वंचितचा पराभव झाला होता. यावेळी मात्र याची पुनरावृत्ती टळली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संगीता अढाऊ तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुनिल फाटकर हे विजयी झाले. अढाऊ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या किरण मोहोड यांचा 25 विरूद्ध 23 मतांनी केला पराभव केला. उपाध्यक्षपदी वंचितचे सुनील फाटकर विजयी झालेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या सम्राट डोंगरदिवे यांचा 25 विरूद्ध 23 मतांनी केला पराभव केला. 


भाजप गैरहजेरीनं आंबेडकरांना सत्तेची 'लॉटरी' 


53 सदस्यीय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 27 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे 25 सदस्यांचे संख्याबळ आहे. तरीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी दोन सदस्यांचे पाठबळ आवश्यक होते. तर 23 सदस्य संख्या असलेल्या महाविकास आघाडीला आणखी चार सदस्यांचे पाठबळ आवश्यक होते. मात्र, आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप गैरहजर राहल्याने याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला झाला आणि  अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वंचितच्या संगीता अढाऊ तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुनिल फाटकर हे विजयी झाले.  याआधी 2019 मध्ये झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीवेळीही भाजप अनुपस्थित राहिल्यानं वंचितचे अध्यक्ष-उपाध्यक्ष विजयी झाले होते. 


भाजपनं शब्द पाळला 


डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना वंचितने छुपी मदत केली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांदा उभे होते. मात्र, वंचितची जवळपास 80 मतं या निवडणुकीत भाजपला पडल्यानं बाजोरियांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या निवडणुकीत भाजपला पाठींबा देताना वंचितनं जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यास मदतीचा शब्द भाजपकडून घेतला असल्याची चर्चा होती. भाजपच्या आजच्या अनुपस्थितीनं या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आहे. 
 
आज अध्यक्षपदी निवड झालेल्या संगिता अढाऊ या जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. अढाऊ या तेल्हारा तालूक्यातील तळेगाव बाजार मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अकोला जिल्हा परिषदेच्या 14 सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. त्या सदस्यांमध्ये अढाऊ यांचंही सदस्यत्व गेलं होतं. मात्र, यावर्षी जानेवारीत झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी तळेगावमधून परत विजय मिळवला. मात्र, त्यानंतर झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांचा अर्ज चुकल्यानं त्यांचं सभापतीपद हूकलं होतं. मात्र, यावेळी त्यांना नशिबानं थेट अध्यक्षपदीच बसवलं आहे. तर ओबीसी आरक्षणात सदस्यत्व गमावलेल्या सुनिल फाटकरांनी पोटनिवडणुकीत पुन्हा विजय मिळवला होता. आता त्यांनाही थेट उपाध्यक्षपद मिळालं आहे. 


 भविष्यातील राजकारणाचे संकेत 


आजच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक असलेल्या माळी आणि कुणबी समाजाला प्रतिनिधित्व दिलं आहे. अध्यक्ष संगिता अढाऊ या माळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. तर उपाध्यक्ष सुनिल फाटकर हे कुणबी समाजातून येतात. जिल्ह्यातील पाचपैकी अकोला पुर्व, बाळापूर, अकोट आणि मुर्तिजापूर मतदारसंघात या दोन्ही समाजाची मते निर्णायक आहेत. आंबेडकरांनी 'माळी-कुणबी' समिकरण साधत दिले भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहेत. 


काँग्रेसने नाकारला आंबेडकरांचा आघाडीचा प्रस्ताव?   
या निवडणुकीत स्पष्ट बहूमतासाठी आंबेडकरांना दोन सदस्य कमी पडत होते. यामूळे आंबेडकरांनी चार सदस्य असलेल्या काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव पाठविला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या बदल्यात काँग्रेसला एक सभापतीपद देण्याचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेससमोर ठेवला होता. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते. मात्र, काँग्रेसनं महाविकास आघाडीतच रहायचा निर्णय घेत आंबेडकरांचा प्रस्ताव नाकारला. ऐनवेळी भाजपने मतदानाला अनुपस्थित रहात वंचितच्या सत्तेचा मार्ग सुकर केला. 


जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी आंबेडकरांचा फडणवीसांना 'फोन'  


जिल्हा परिषदेच्या सत्तेची 'चावी' पाच सदस्य असलेल्या भाजपच्या हाती होती. त्यामूळे भाजपच्या भूमिकेवरच वंचित आणि महाविकास आघाडीच्या सत्तेचे पत्ते खुलणार होते. कारण वर्षभरापूर्वी दोन सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मदत केल्याने वंचितचा पराभव झाला होता. त्यामूळे यावेळी आंबेडकर सजग होते. काँग्रेसनं आघाडीचा प्रस्ताव फेटाळल्याने आंबेडकरांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करीत भाजपनं मतदानाला अनुपस्थित राहण्याचा प्रस्ताव ठेवला. फडणवीसांनी महाविकास आघाडीचा विरोध या सूत्रानं आंबेडकरांचा प्रस्ताव स्विकारत आंबेडकरांना अप्रत्यक्ष मदत करण्याचं मान्य केलं. फडणवीसांनी अकोला जिल्हा परिषदेतील हे 'ऑपरेशन' जिल्हाध्यक्ष आणि आमदार रणधीर सावरकरांच्या माध्यमातून पूर्ण करीत आंबेडकरांसोबतची मैत्री जपल्याचं बोललं जात आहे. याआधीही 2019 मध्ये झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीवेळीही भाजप अनुपस्थित राहिल्यानं वंचितचे अध्यक्ष-उपाध्यक्ष विजयी झाले होते. भाजपनं दुसर्यांदा आंबेडकरांना मदत करीत त्यांच्या 'अकोला पॅटर्न'चा पाया असलेली जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात द्यायला मदत केली. 


अकोला जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल  
एकूण जागा : 53
वंचित बहुजन आघाडी : 25
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 12
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
अपक्ष : 02