शिवबंधन सोडून हाती घड्याळ घेतलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यामुळेच राष्ट्रवादीवर जाहीर सभेत मतदान घेण्याची वेळ आली आहे. कोल्हेंच्या पक्षप्रवेशानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून संवाद यात्रा सुरु आहे. गुरुवारी मंचरमध्ये पार पडलेल्या या जाहीर संवाद यात्रेत अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मतदानच घेतलं, यासाठी उपस्थितांना हात वर करण्याचं आवाहन केलं गेलं.
विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे आणि अमोल कोल्हे अशा चौघा जणांच्या नावाबाबत विचारणा झाली. त्यावेळी लांडे, निकम आणि गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र अमोल कोल्हे यांचं नाव घेताच सभागृहात एकच जल्लोष झाला.
खरं तर कोल्हे यांना मिळालेली पसंती ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पथ्यावर पडणारीच म्हणावी लागेल. कारण राष्ट्रवादीला कोल्हे यांनाच शिरुर लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी कोल्हेच दोन हात करु शकतात, असा राष्ट्रवादीने पक्का ग्रह बांधला आहे.
आयात केलेल्या उमेदवारावर इतर इच्छुक नाराज राहू नयेत, म्हणून जाहीर मतदान घेण्याचा आटापिटा अजित पवारांनी केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जनतेनेच निवडून दिलेल्या उमेदवाराच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतील, यात तीळमात्र शंका नाही.