भंडारा : घरात वडिलांचा मृतदेह असताना खचून न जाता दहावीतील विद्यार्थिनीने बोर्डाची परीक्षा देत इतर मुलांना न खचण्याचा संदेश दिला आहे.  लाखांदूर तालुक्यातील खैरीपट गावातील ही घटना आहे. विद्यार्थिनी पेपर देऊन परतल्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात खैरी / पट येथील प्रणाली खेमराज मेश्राम ही मुलगी आई, वडील आणि एका भावासोबत राहते. प्रणालीचे वडील एस.टी. महामंडळात बस चालक म्हणून काम करत होते. स्वत:वर अनुभवलेले दिवस मुलांवर येऊ नये, म्हणून दोन्ही मुलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे हा त्यांचा ध्यास होता. प्रणालीला ते अभ्यासासाठी नेहमीच प्रेरित करत होते.

दहावीत असलेल्या प्रणालीचे सध्या बोर्डाचे पेपर सुरु आहेत. परीक्षेपूर्वी प्रणालीच्या वडिलांना कर्करोगाने ग्रासलं आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वडील गेल्यामुळे प्रणालीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण तरीही तिने खचून न जाता दहावीची परीक्षा दिली. तिला अधिकारी होऊन हयात नसलेल्या आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आज तिने दाखविलेली शैक्षणिक वृत्ती तालुक्यात कुतुहलाचा विषय ठरत आहे .