मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) एकीकडे महायुतीत (Mahayuti) सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे विरोधकांना धक्के देत असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे दोन बडे नेते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील नाशिकच्या नेत्याने अजित पवारांची मुंबईत भेट घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महायुतीला जोरदार धक्के दिले होते. महायुतीतील अनेक बड्या नेते महाविकास आघाडीत गेल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तर महाविकास आघाडीचा लाजीरवाणा पराभव झाला. अजित पवारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिल्याचे दिसून येत आहे. 


राहुल जगताप, मानसिंग नाईक अजित पवारांच्या भेटीला 


अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात करत प्लॅन बी आखण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली होती. अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी आता त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले राहुल जगताप यांच्यासह शिराळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शरद पवार गटाचे नेते मानसिंग नाईक यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. 


प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात


राहुल जगताप हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते डॉ. अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी अपूर्व हिरे यांनी त्यांचे बंधू मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, शिंदे गटाचे दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा पराभव केला. आता अपूर्व हिरे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने ते पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांची आज तीन बड्या नेत्यांनी भेट घेतल्याने त्यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 


आणखी वाचा 


Eknath Shinde: हातात कागदपत्रे, चेहऱ्यावर निराशा...; दरेगावातून निघताच आजीबाई समोर आल्या, एकनाथ शिंदेंनी लगेच गाडी थांबवली अन्...