Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या दरे दौऱ्यानंतर काल (1 डिसेंबर) सायंकाळी ठाण्यात परतले. दरेगावी गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना ताप आला होता. त्यामुळे त्यांना घरी सलाइन लावल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली. काल तब्येतीत सुधारणा झाल्यावर ते सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी हॅलिकॉप्टरने ठाण्याकडे रवाना झाले.
दरेगावातून ठाण्यासाठी निघताना एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह गावातील ग्रामदैवत जननी आईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यादरम्यान दरेगावातून ठाण्यासाठी रवाना होण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह हॅलिपॅडच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी दरेगावातून निघताना एकनाथ शिंदेंच्या गाडीसमोर एक आजी समोर आली. यावेळी एकनाथ शिंदेंनी तातडीने गाडी थांबवत, त्यांची विचारपूस केली. यावेळी आजीच्या हातात काही कागदपत्रे होते. तिने अपंग मुलासाठी मदतीची मागणी केली. आजीच्या या मागणीनंतर एकनाथ शिंदेंनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले आणि तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले.
सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार?
मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले. मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर झालेलं नाही. उपमुख्यमंत्री किती असणार कोण कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबलेली आहे. सत्तास्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत. मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.
बैठकीबाबतच संभ्रम-
तत्पर्वी ज्येष्ठ भाजप नेत्याच्या हवाल्याने पीटीआयने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होण्याची बातमी दिली होती. आज किंवा उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नेता निवडला जाईल अशी माहिती होती. मात्र आता या बैठकीबाबतच संभ्रम निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय. दरम्यान 5 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.