मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांच्या आमदारांची भूमिका हा रडीचा डाव असल्याचं म्हटलं. मी देखील मविआत काम केलं आहे. निवडणुकीच्या इव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. लोकसभेला इव्हीएमनी मविआला 31 जागा दिल्या तेव्हा ते चांगलं होतं. मविआचे 31 निवडून आले तेव्हा चांगली होती, इकडं वेगळा निकाल लागला तेव्हा त्यावेळेला इव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय वक्तव्य करायचा हा त्यांचा अधिकार आहे. उद्याचा दिवस शपथविधीचा आहे, त्यांना शपथ घ्यावीच लागेल.  तर, परवा दिवशी कामकाजात भाग घेता येईल, ही प्रक्रिया आहे हे सर्वांना माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले. 


पहिल्याच दिवशी आपण वेगळं काम करतोय. आम्ही जरी संख्येनं कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय, असं दाखवण्याचा केविलवाणा प्रकार चाललेला आहे. याला काही अर्थ नाही, सुरुवातीला ते आत बसलेले होते. सुरुवातीच्या आठ दहा लोकांच्या शपथा झाल्यानंतर मी शपथ घेऊन खाली उतरताना विचारलं तर आम्हाला सांगितलं की आज शपथ घ्यायची नाही, अशी स्ट्रॅटेजी असल्याचं काही जणांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. 


दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टानं दिलेल्या निर्णयाबाबत विचारलं असता अजित पवार यांनी ते काही खरं नसल्याचं म्हटलं. मी त्यांच्यासोबत होतो, कुठलाही कोर्टाचा निर्णय एका दिवसात लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते, चौकशी घेतल्यानंतर तुम्हाला अपिल करण्याचा अधिकार असतो. प्रक्रिया अधिक दिवस चालली होती. मी यांच्याबरोबर असेल तर अजित पवार चांगला असतो. मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो तर बाकीच्यांनी माझ्यासोबत काम केलं नसतं. मला पदं मिळाली नसती. राजकीय भूमिकेतून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मी योग्य त्या ठिकाणी न्याय मागत होतो, असं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार यांनी भाजप नेते मधुकर पिचड यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार असल्याचं सांगितलं. ते दुपारी दीड वाजेपर्यंत अकोले येथे जाणार आहेत. 


दरम्यान, विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेत सभात्याग केला. विरोधी पक्षाचे आमदार उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांचे आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.



इतर बातम्या :


'भाजपच्या घरात शिरला की डाग पुसले जातात', विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांसह भाजपला टोला, म्हणाले..