नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीएच्या डिनर पार्टीमध्ये 36 घटकपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. या अनौपचारिक बैठकीत पंतप्रधान मोदींनी एनडीएतील घटकपक्षांना विश्वासघात न करण्याचं आश्वासन दिलं. एनडीए म्हणजे केवळ आघाडी नसून एक कुटुंब असल्याच्या भावना यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई डिनरला उपस्थित होते.


मला पंतप्रधानपदी विराजमान करण्यामागे एनडीएमधल्या अनेक पक्षांचीही मेहनत आहे. तुम्हा सगळ्यांचं हे योगदान विसरता येणार नाही. तुमचा विश्वासघात करणार नाही, असा नरेंद्र मोदींचा बदललेला सूर एनडीएच्या बैठकीत पाहायला मिळाला.

एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. ही एनडीएची बैठक नाही, तर एकमेकांचं हृद्य मीलन आहे.
आम्ही घटकपक्षांनी याआधीच नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून निवडलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.



उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीत दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्रात दुष्काळावर तात्काळ आणि हवी ती मदत देण्याची मागणी उद्धव यांनी केली. अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनीही 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाची आठवण करुन दिली.

या बैठकीत नितिश कुमार यांनी ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर लावला. बिहारमध्ये माझ्या बहुतांश मतदार या महिला आहेत, त्यांच्यासाठीही काही भरीव कार्यक्रम पाहिजे असंही नितीश म्हणाले.

एनडीए 315+, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, अंकशास्त्र अभ्यासकांचं भाकित काय?

एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वच वाहिन्या आणि संस्थांनी जास्त जागा दाखवल्यानंतर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांनी एनडीएच्या सर्व नेत्यांसाठी राजधानी दिल्लीत डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं.

भाजपच्या बाजूने उद्या निकाल लागला, तर रविवार 26 मे रोजीच नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नरेंद्र मोदींची जन्मतारीख 17 आहे. 1 आणि 7 या अंकांची बेरीज 8 होते. तसंच 26 तारखेतल्या अंकाची म्हणजे 2 आणि 6 ची बेरीजही 8 होते. म्हणून मोदी 26 तारखेच्या शपथविधीसाठी आग्रही असल्याचं म्हटलं जातं.

डिनर पार्टीला कोण कोण?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई (शिवसेना)
प्रकाश सिंह बादल (अकाली दल), पंजाब
नितीश कुमार (जदयू), बिहार
पावन चामलिंग (एसडीएफ), सिक्कीम
कोनार्ड संगमा (नॅशनल पीपल्स पार्टी), मेघालय
नेफ्यू रियो (एनडीपीपी), नागालँड
पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम  (एआयएडीएमके), तामिळनाडू
जीके वासन (तामिळ मनिला काँग्रेस TMC), तामिळनाडू
विजयकांत यांच्या पत्नी प्रेमलता (डीएमडीके), तामिळनाडू
अंबुमणि रामदास (पीएमके), तामिळनाडू

भाजपसोबत एनडीएमध्ये असलेले पक्ष

भाजपसोबत एनडीएमध्ये 40 लहान-मोठे पक्ष आहेत. यामधील 9 पक्षांचा मोठा प्रभाव आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. यानंतर जदयू, अण्णा द्रमुक, एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यासह 40 पक्ष एनडीएमध्ये आहेत.