फडणवीस सरकार उदार, माढ्यातील शेतकऱ्याला 4 रुपयाचं खरीप अनुदान
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2019 09:32 AM (IST)
आधीच शेतकरी दुष्काळाने होरपळले आहेत. त्यात सरकारने त्यांच्या खात्यावर चार रुपयांचं अनुदान दिल्याने संतापाचं वातावरण बनू लागलं आहे.
पंढरपूर : दुष्काळात खरिपाच्या पिकांची वाट लागल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अशावेळी सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याती सरकारकडून थट्टा सुरु असल्याचं चित्र आहे. माढा तालुक्यातील शेतकऱ्याला अवघ्या चार रुपयांचं खरीप अनुदान मिळालं आहे. पंडित इंगळे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते ढवळस गावात राहतात. पंडित इंगळे यांची एक एकर जमीन असून सुरुवातीला ऊस लावला होता. मात्र तो जळून गेल्याने इंगळे यांनी त्यात तूर लावली होती. तूरही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यांनी दाखवली होती. मात्र सरकारकडून खरिपाला केवळ चार रुपयांचं अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा झालं. "मदत दिली नसती तरी चाललं असतं, मात्र चार रुपये अनुदान देऊन थट्टा का करताय, असा प्रश्न आता या शेतकऱ्याने विचारला आहे. आधीच शेतकरी दुष्काळाने होरपळले आहेत. त्यात सरकारने त्यांच्या खात्यावर चार रुपयांचं अनुदान दिल्याने संतापाचं वातावरण बनू लागलं आहे. सरकार चार रुपयांचं अनुदान देऊन ही क्रूर चेष्टा का करत आहेत, असा सवाल इंगळे करत आहेत. तसंच बॅंकेतून कमीत कमी 500 रुपये काढता येत असताना हे सरकारचे चार रुपये कसे काढायचे, असा प्रश्नही पंडित इंगळे यांना पडला आहे.