पक्षामध्ये होणाऱ्या अवहेलनेमुळे बऱ्याच दिवसांपासून घुसमट सुरु होती. ती कुठपर्यंत सहन करायची, हा प्रश्न कार्यकर्तेही विचारत होते.
जिथे स्वाभिमानाला ठेच पोहचते तिथे राहण्यात स्वारस्य नव्हतं, अशा भावना जयदत्त क्षीरसागर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केल्या.
'वादळात दिव्याचं रक्षण केलं, आता दिव्यानेत हात पोळले' अशा शब्दात राष्ट्रवादीवर निशाणा साधतानाच 'हेचि फळ काय मम तपाला' असा काव्यात्मक सवालही क्षीरसागर यांनी उपस्थित केला. नाराजीबद्दल शरद पवारांशी खुलेपणाने चर्चा केल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.
लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे क्षीरसागर आमदारकीचा राजीनामा सोपवणार आहेत. मनगटावरील घड्याळ सोडून ते शिवबंधन बांधणार आहेत. माझं हे पहिलंच पक्षांतर असल्याचंही ते बोलले.
आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे नेहमी सामंजस्याची भूमिका घेतली. कोणाला मानाचं स्थान द्यायचं हे पक्षाचं धोरण आहे. मात्र नव्या-जुन्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व असायला हवं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.