शरद पवारांच्या पावसातील सभेचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक, उद्धव ठाकरेंचा मात्र पवारांवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2019 02:10 PM (IST)
मुंबईत आज पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी सुरु असतानाच मुंबईतील धारावीमध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो झाला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा चर्चेचा विषय आहे. युवासेना प्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनीही शरद पवार यांचं कौतुक केला आहे. शरद पवारांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत आज पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी सुरु असतानाच मुंबईतील धारावीमध्ये आदित्य ठाकरेंचा रोड शो झाला. यावेळी त्यांनी शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाचं कौतुक केलं. आदित्य ठाकरेंच्या या रोड शोमध्ये सलमान खानचा बॉडीगार्ड शेराही सहभागी झाला होता. पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं : आदित्य ठाकरे यावेळी आदित्य ठाकरेंना शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, "मी शरद पवारांवर वैयक्तिक टीका कधीच केली नाही. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र आहेत. काल शरद पवारांनी पावसात भिजून जे काही केलं आहे, ते खरंच सगळ्यांनी कौतुक करण्यासारखं आहे." उद्धव ठाकरेंची मात्र पवारांवर टीका एकीकडे आदित्य ठाकरे शरद पवारांचं कौतुक करत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. "तेव्हा जर 70 कोटींचा भ्रष्टाचार केला नसता तर तुम्हाला पावसात भिजायची वेळ आली नसती," अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधला. पायंडा बाळासाहेबांनी घातला : अरविंद सावंत "तर बाळासाहेबांनी अनेक सभा वादळी वाऱ्यात, पावसात, चिखलात घेतल्या होत्या. मी त्याचा साक्षीदार आहे. शरद पवारांचं कौतुक आहेच पण हा पायंडा बाळासाहेबांनी घातला आहे हे विसरुन चालणार नाही," असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. शरद पवारांची पावसात सभा पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी काल (18 ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात सभा घेतली. यावेळी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधला. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली शरद पवारांनी दिली. मात्र पाऊस कोसळत असताना पवारांनी घेतलेली सभा ही चर्चेचा विषय ठरली.