मुंबई : विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाहायला मिळालं. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून आली. त्यात, सत्ताधारी असल्याने महायुतीमधील (Mahayuti) तिन्ही प्रमुख पक्षांत बंडखोरांची संख्या जास्त होती. त्यामुळे, बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या तिन्ही पक्षांकडून देण्यात आला होता. त्यानंतर, आता कारवाईला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली. याशिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (sunil tatkare) यांनी केली आहे. त्यामध्ये, पुण्यातील मावळ मतदारसंघात बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत निलंबन केल्याचे पत्र जारी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पुजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा श्रीमती ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर आदींचा कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेत कामकाज केले. तसेच, पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्या 8 नेत्यांची अजित पवारांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निलंबित केलेल्या नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेडच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुजा व्यवहारे, धुळ्याचे ज्ञानेश्वर भामरे, दहिसरच्या ममता शर्मा, भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे धनेंद्र तुरकर आणि नांदेडचे युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लवकरच इतरही बंडखोरांवर कारवाई होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले