धुळे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात बड्या नेत्यांच्या सभांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा आज खान्देशातील धुळे जिल्ह्यात झाली असून दुसरी सभा नाशिक येथे होत आहे. धुळ्यातील सभेतून मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत संविधान, महिलांसाठी योजना आणि विकासाच्या मुद्द्यावर भाषण केले. केंद्र सरकारने कायम महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले. महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु केलेल्या योजनांची मविआने खिल्ली उडवली. मात्र, आज याच योजना प्रमुख आधार झाल्या आहेत. महायुती सरकारने 25 हजार महिला पोलिसांची भरती केली. यामुळे महिलांना सामर्थ्य मिळाले, त्यांना रोजगार मिळाला, त्या सशक्त झाल्या, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendar Modi) यांनी येथील भाषणात केला. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी धुळ्यातील सभेतून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या सभेतील भाषणानंतर मोदींनी सर्वच उमेदवारांना समोर येण्याचं आवाहन केलं. त्यावेळी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे धावत पळत आल्याचं पाहायला मिळालं. 


पंतपधान नरेंद्र मोदींनी आपले भाषण संपल्यानंतर मोदींनी धुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना व्यासपीठावर समोर बोलावले होते. त्यावेळी, देवेंद्र फडणवीस हे खु्र्चीवरच बसून होते. मात्र, नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत, देवेंद्रजी तुम्ही देखील उमेदवार आहात, असे म्हणताच फडणवीस धावत-पळतच पुढे आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, मोदींसोबत हातात हात घेऊन त्यांनी समोरील जनतेला अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 




महायुतीकडून महिला सशक्तीकरण 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महिला वर्गाला साद घालण्यासोबत महायुतीच्या काळात झालेला विकास आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा अधोरेखित करत एकप्रकारे विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला. त्यांनी म्हटले की, आमचं सरकार महिला सशक्तीकरणासाठी जी पावलं उचलत आहे, ती मविआला सहन होत नाहीत. लाडक्या बहीण योजनेची देशभरात चर्चा सुरु आहे. पण काँग्रेसी व्यवस्थेतील लोक ही योजना बंद करण्यासाठी कारस्थान रचत आहेत. महाविकास आघाडीला राज्यात सत्ता मिळाली तर काँग्रेस ही योजना बंद करेल. त्यासाठी महाराष्ट्रातील महिलांनी सतर्क राहिले पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं. 


वचननाम्यातील 10 संकल्पावर भाष्य


महायुतीच्या वचननाम्यातील 10 संकल्प हे प्रत्येक वर्गाच्या विकासाची हमी, समानतेची ग्वाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा विश्वास देणारा आहे. हा वचननामा विकसित भारताचा आधार आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी महिलांचं पुढे जाणं, त्या सशक्त होणे गरजेचे आहे. महिला पुढे जातात तेव्हा समाज पूर्ण वेगाने प्रगती करतो, असे मोदींनी म्हटले.


हेही वाचा


''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण