ABP News C Voter Survey: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) मध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध लढण्यासाठी 25 हून अधिक पक्षांनी एकत्र येत 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) ची स्थापना केली. परंतु, विरोधकांनी त्यांच्या पंतप्रधान पदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. पंतप्रधान पदासाठी विरोधकांमधील अनेक नावं चर्चेत आहेत. परंतु, अद्याप नावांवर एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. 


अलीकडेच आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी अरविंद केजरीवाल पंतप्रधानपदाचं उमेदवार असावेत, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर सपाच्या प्रवक्त्या जुही सिंह यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचे नेते अखिलेश यादव यांच्यासाठी अशीच इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही म्हटलं होतं की, प्रत्येकाला त्यांच्या नेत्याबद्दल आदर आहे, त्यांनाही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावं असं वाटत आहे.


त्याचवेळी, या घटनेच्या सुमारे महिनाभरापूर्वी ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली होती. दरम्यान, नंतर आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा म्हणाले होते की, "आप पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, इंडिया आघाडीमध्ये अनेक प्रशासक आहेत, परंतु भाजपकडे एकच नेता आहे."


अशा परिस्थितीत विरोधी आघाडीनं लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान चेहरा जाहीर करायचा का? हा मोठा प्रश्न आहे. याचसंदर्भात एबीपी न्यूजसाठी, सी-व्होटरनं एका सर्वेक्षणातून लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 


विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान पदाच्या दावेदाराची घोषणा करावी? 


(सोर्स- सी-वोटर)
हो : 50 टक्के
नाही : 22 टक्के
काहीच सांगू शकत नाही : 28 टक्के


सर्वेक्षणातील या प्रश्नावर सर्वाधिक 50 टक्के लोकांनी म्हटलं आहे की, विरोधकांनी 2024 लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. तर, केवळ 22 टक्के लोकांनी नाही, असं म्हटलं आहे, तर 28 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते याबाबत काहीच सांगू शकत नाही. 


यंदाच्या विधानसभा निवडणुकीला 2024 लोकसभेची सेमीफायनल म्हटलं जात आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं या मुद्द्यावर अखिल भारतीय सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 2 हजार 686 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. शनिवारपासून आज (12 ऑक्टोबर) दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष पूर्णपणे लोकांशी साधलेला संवाद आणि त्यांनी व्यक्त केलेली मत यावर आधारीत आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.