मुंबई : राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा होणर असल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडीला राज्यात 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. एकंदरीत पाहता, दोन्ही गटांना फिफ्टी-फिफ्टी संधी असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 


एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोल समोर आला असून त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार टक्कर असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. त्यांना 9 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राज्यात 17 जागा लवढल्या होत्या. त्यामधील 8 ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं जातंय. 


शरद पवारांचे किती खासदार निवडून येणार? 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राज्यातील 10 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 6 जागी त्यांचे खासदार निवडून येतील असा अंदाज एबीपी सी व्होटरमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्याचसोबत एक अपक्षही निवडून येणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे सांगलीमध्ये विशाल पाटील हे बाजी मारतील असा अंदाज सांगतोय. 




उद्धव ठाकरेंना 9 जागांचा तोटा


गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले होते. शिवसेना फुटल्यानंतर त्यापैकी 13 खासदार हे त्यांना सोडून गेले, तर पाच खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले. यंदा उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना 9 जागांचा तोटा होणार असं सांगितलं जातंय. 


गतवेळच्या तुलनेत यंदा काँग्रेसला सात जागांचा अधिकचा फायदा होणार असल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. त्या तुलनेत यंदा 8 खासदार निवडून येतील असं सी व्होटरचा सर्व्हे सांगतोय. त्यामुळे यंदा काँग्रेसला सात खासदारांचा फायदा होतोय असं दिसतंय.


भाजपला 6 जागांचा तोटा


2019 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 23 जागा निवडून आल्या होत्या. त्यांना आता सहा जागांचा तोटा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपने 28 जागा लढवल्या असून त्यांना 17 जागा मिळणार असल्याचा अंदाज सांगतोय. 


ही बातमी वाचा: