सातारा : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका (Election) होत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हाव, यासाठी निवडणूक आयोग मतदार जागृती करतो. तसेच, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. यंदा प्रथमच 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी निवडणूक अधिकारी घरी जाऊन मतदान (voting) घेणार आहेत. त्यामुळे, मतदार व प्रशासन दोघांमध्येही वेगळाच उत्साह असल्याचं दिसून येतय. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. त्यात अशी काही उदाहरणं असतात, जी आपणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपलं लक्ष फक्त शहरी भागांकडे राहतं. मात्र, अशी काही खेडी असतात, दुर्गम भाग असतात, की त्या ठिकाणी पराकाष्टा करुन बुथ उभी करावी लागतात. छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) उमेदवार असलेल्या मतदारसंघातही असंच एक बुथ आहे. जिथे पोहोचण्यासठी प्रशासनाने मोठी कसरत केली आहे.  


लोकसभा निवडणुकांत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं यासाठी प्रशासकीय यंत्रणा कसोटीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांशी निगडित असलेली अशी काही गाव आहेत, त्या ठिकाणी एक मतदानाचे बुथ उभा करायला प्रशासकीय यंत्रणेला मोठं काम करावं लागलं, मोठी कसरत करावी लागलीय. फुफुटा उडवत मतदानाच्या पेट्या घेऊन कोयना जलाशयाच्या आतमध्ये निघालेल्या गाड्या, त्यानंतर त्या पेट्या जलाशयातील बोटीतून घेऊन जात असतानाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. 


खिरखिंडी गावात पोहोचल्या मतपेट्या


सुमारे पाऊण तासाचा हा बोटीचा प्रवास करुन बोटीतनं उतरून पुन्हा खिरखिंडी या गावापर्यंतचा अतिशय भयावहक प्रवास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार केलाय. नदीतून प्रवास करताना बोट हवेने हुलकावन्या देत होती. मात्र, बोट चालकाने बोट काठावर लावली. अनेक कर्मचारी आजपर्यंत कधीच यातील बोटीत बसले नव्हते. त्यानंतरचा हा असा दगड धोंड्यातला खडतर प्रवास करुन ते मार्गक्रमण करत राहिले, अनेकजण भयभीत झाले होते. मात्र, ते दाखवून देत नव्हते.... कारण आपणाला खऱ्या अर्थानं मतदारांना मतदारांचा हक्क बजावून घ्यायचा होता. अखेर, सुमारे एक तासाच्या पायपीटीनंतर दगड धोंड्यातील प्रवासानंतर खिरखिंडी हे गाव लागलं. गावाला पाहताच सगळ्यांना हायसं वाटलं, जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. चेहऱ्यावर ओघळलेला घाम पुसत-पुसत मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे, हे अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, येथील मतदारांनी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावत आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे, हीच प्रशासनाची अपेक्षा आहे. 


केवळ 27 मतदानासाठी कसरत


अवघं 27 मतदान असलेलं हे गाव. विशेष म्हणजे केवळ  27 मतदानासाठी हा सगळा खटाटोप होता. गावातील मतदारांना विचारलं, ताई तुमच्या समस्या काय आहेत, जिथे लाईट नाही,पाणी नाही, रस्ता नाही अशा लोकांना उमेदवार तरी कसा असेल माहित असेल. चक्क उमेदवारही या लोकांना माहीत नव्हता, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही मतदानाचा हक्क बजावणारच. त्यामुळे, साहजिकच प्रशासनाने जी मेहनत घेतली, जे कष्ट घेतले, जी यंत्रणा कामाला लावली ती सार्थकी ठरेल, असेच म्हणता येईल.


हेही वाचा 


Video: तेच मैदान, तीच निवडणूक, शरद पवारांना पावसातील सभेची आठवण; हाती आसूड घेऊन गाजवलं सातारा