TOEFL Higher Studies: सध्या अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Student) परदेशात उच्च शिक्षणासाठी (Higher Education Abroad) TOEFL चा पर्याय निवडताना दिसतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी बारावी झाल्यानंतर शिक्षणासाठी परदेशात जातात. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. यावर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारनं काही माहिती दिली आहे. केंद्र सरकानं उत्तरात म्हटलं की, सध्या 12 लाख विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत, तर 2017 मध्ये ही संख्या 4 ते 5 लाखांवर पोहोचली होती. दरम्यान, परदेशात शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या TOFEL परीक्षेला बसणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


TOEFL देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली 


एका अवहालातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एज्युकेशन टेस्टिंग सर्व्हिस (ETS) (TOFEL परीक्षा आयोजित करणारी संस्था) यांनी दिलेल्या माहितीनुसार, UG-PG अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी TOFEL देणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. पीटीआयनं केवळ प्राप्त आकडेवारीनुसार,  TOEFL साठी भारतीय परीक्षार्थींची टक्केवारी 2021 मध्ये एकूण उमेदवारांच्या 5.83 टक्क्यांवरुन वाढून 2022 मध्ये 7.77 टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये भारतीय TOEFL परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये परीक्षार्थींच्या संख्येत 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, चेन्नई, कोलकाता यासह देशातील लहान-मोठ्या शहरांतील विद्यार्थी परदेशात TOEFL मध्ये शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे TOEFL म्हणजे नेमकं आहे काय? आणि या परीक्षेबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात...


TOEFL म्हणजे काय?


बारावीनंतर देशातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग निवडतात. पण इतर देशांच्या विद्यापीठांमध्ये प्रेवश मिळवण्याची प्रक्रिया तसं पाहता फारशी सोपी नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना काही चाचण्या पास कराव्या लागतात, त्यानंतरच त्यांना परदेशात चांगलं कॉलेज मिळवणं शक्य होतं. या परीक्षांपैकीच एक परीक्षा म्हणजे, TOEFL. विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचण्याची, लिहिण्याची, बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. भारतात आणि परदेशातील अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची पहिली भाषा इंग्रजी नाही. पण जर त्यांना परदेशी विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असेल तर तेथे चांगले इंग्रजी येणे अत्यंत आवश्यक आहे. या परीक्षेद्वारे इंग्रजी प्रवीणता मोजली जाते. संगणक-आधारित ETS TOEFL दरवर्षी 60 पेक्षा जास्त वेळा आयोजित केले जाते आणि नियुक्त केलेल्या चाचणी केंद्रांवर घेतले जाऊ शकते.


TOEFL कोण देऊ शकतं? 


TOEFL परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात. तरच तुम्ही या परीक्षेला बसू शकता. जर आपण वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही वयाची व्यक्ती या परीक्षेला बसू शकते. दरम्यान, परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे, जी परदेशात शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वयोमर्यादेइतकीच आहे. परंतु, परीक्षार्थ्याकडे मान्यताप्राप्त मंडळाचे बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.


कधी आणि कशी घेतली जाते परीक्षा? 


TOEFL परीक्षा दोन स्वरुपात घेतली जाते. पहिला पेपर ऑनलाईन आधारीत असतो, ज्याला TOEFL IBT फॉरमॅट असं म्हणतात. तर दुसरा पेपर TOEFL PBT फॉरमॅटमध्ये असतो. तुम्ही तुमच्या चाचणी केंद्रानुसार दोनपैकी एक चाचणी फॉरमॅट निवडू शकता. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 78 गुण आवश्यक आहेत. परीक्षेच्या 10 दिवसांनी निकाल जाहीर केला जातो. 


परीक्षेचे फायदे काय? आणि किती शुल्क भरावं लागतं? 


TOEFL परीक्षा अनेक विद्यापीठं, शाळा आणि इतर संस्थांद्वारे मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. TOEFL चाचणीद्वारे, उमेदवारांना इंग्रजी प्रवीणता स्तरासाठी प्रमाणित केलं जातं ज्याच्या आधारावर ते विविध पदवीपूर्व, पदव्युत्तर, डॉक्टरेट, शालेय शिक्षण आणि फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात. जगभरातील 10 हजारांहून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठं आणि एजन्सी TOEFL ला पसंती देतात. एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव ऑफलाईन परीक्षा देता येत नसेल तर तो ऑनलाईन परीक्षाही देऊ शकतो.


परदेशात शिकण्यासाठी इतर कोणत्या परीक्षा महत्त्वाच्या? 


TOEFL व्यतिरिक्त, IELTS, GRE, SAT, GMAT, PTE, MCAT चाचण्या देखील परदेशात शिकण्यासाठी घेतल्या जातात. जे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा करते. उमेदवारांच्या इंग्रजी आणि तांत्रिक कौशल्याची चाचणी घेण्यासाठीही हे पेपर घेतले जातात.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI