नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं 'नफेखोरी'चं धोरण सुरू केलंय का? असा प्रश्न सध्या विचारला जातोये. याला कारण आहे विद्यापीठानं यावर्षी सर्वच अभ्यासक्रमासाठी आपल्या शैक्षणिक शुल्कात केलेली भरमसाठ वाढ... विद्यापीठानं बी. ए. आणि बी. कॉम. प्रथम वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात 1702 वरून 2988 रूपयांपर्यंत वाढ केलीये. ही वाढ 75 टक्के इतकी आहेय. याशिवाय बी. एस. सी, डी. सी. एम. आणि एम. ए. सह इतर अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कात 35 ते 55 टक्क्यांनी वाढ केलीये. मुक्त विद्यापीठाच्या या धोरणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतोये. यामूळे त्यांचं शिक्षणच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालीये.
गेल्या तीन वर्षांत शैक्षणीक शुल्कात अशी झाली वाढ
अभ्यासक्रम २०२१-२२ २०२२-२३ २०२३-२४
बी. ए. - १ ११०० १७०२ २९८८बी. ए. - २ १६०० २३०२ ३६०८बी. ए. - ३ १६०० २५०२ ४०३८बी. कॉम. - १ ११०० १७०२ २९८८बी. कॉम. - २ १६०० २३०२ ३६०८बी. कॉम. - ३ १६०० २५०२ ४०३८बी. एस. सी. - १ २१०० ६२०२ ९६२८बी. एस. सी. - २ २१०० ६२०२ ९५१८बी. एस. सी. - ३ २१०० ६२०२ ९८७८एम. ए. मराठी - ३००० ५१०२ ६९४६एम. कॉम. - १ २१०० ३७०२ ५५०८एम. बी. ए. - १ १२१०० १५२०२ १६८७८एम. बी. ए. - २ १३१०० १७७०२ १९४९८
एकाच टप्प्यात भरावे लागणार शुल्क :
या शैक्षणिक शुल्कात वाढ करतांना ते एकाचवेळी भरणं विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. याआधी शैक्षणिक शुल्क दोन टप्प्यांत भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिली होती. मात्र, आता एकाचवेळी हे पैसे भरावे लागणार असल्याने अनेकांचं शिक्षणाचं स्वप्नं भंग पावण्याची शक्यता आहे. एकाचवेळी पैसे भरण्याच्या विद्यापीठाच्या अट्टाहसाने विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या तिजोरीत १ हजार कोटींच्या ठेवी? :
मुक्त विद्यापीठाच्या तिजोरीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असल्याची माहिती आहे. असं असतांना ही शुल्कवाढ कशासाठी?, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. त्यामूळे मूक्त विद्यापीठानं आता ज्ञानदानाऐवजी नफेखोरीचा धंदा सुरू केला काय?, असा संतप्त प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. या विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना जवळपास पाच लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. येथे प्रवेश घेणारे विद्यार्थी हे सामान्यत: गरिब, कामगार, नोकरदार आणि छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या वर्गातील आहेत. त्यामुळे या फी वाढीमुळे अनेकजण शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाची शैक्षणिक शुल्कवाढ केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांशी विसंगत :
१९८९ पासून ५०० विद्यार्थी असलेले विद्यापीठ, ६ लाखांपर्यंत पोहचले होते.परत आता ती संख्या मागील शैक्षणिक वर्षात पाच लाखापर्यंत येऊन पोहोचली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये एकूण नोंदणी प्रमाण ('ग्रॉस एनरोलमेंट रेशो') हा २०३५ पर्यंत ५० टक्के पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या तो जवळपास २९.१ टक्के आहे. हा वाढवण्यात मुक्त विद्यापीठ भरीव कामगिरी करू शकते. ते करण्याच्या दृष्टीने पावले पडणे आवश्यक आहे. परंतु, ते न करता यंदा एकाएकी विद्यार्थ्यांच्या सर्वच शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात मुक्त विद्यापीठाने 'अविवेकी' निर्णयाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यात भरीस भर म्हणून या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले प्रवेश शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.आतापर्यंत दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. प्रवेश शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब असो की एकाच टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची अट असो, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असलेले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती आहे.
विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष गप्प का? :
या अविवेकी व निर्दयी फी वाढीबद्दल विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांकडून कुठेही आवाज उठलेला दिसत नाही. याचे कारण विद्यापीठाचे कर्मचारी प्रशासनाच्या धाकामुळे,अभ्यास केंद्रे हे विद्यापीठावर अवलंबून आहेत. यासोबतच विद्यार्थी हे महाराष्ट्रभर असल्याने ते असंघटित आणि आपल्याच विवंचनेत असल्याने, या फी वाढीची ओरड कुठेही दिसून येत नाही. याचाच फायदा विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याचा आरोप होत आहे.
एरव्ही विद्यार्थी हिताच्या बाता करणाऱ्या अनेक विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी या पाशवी फी वाढीकडे पुर्णत: दुर्लक्ष केलं आहे. एरव्ही राजकारणात मश्गुल असलेले सत्ताधारी आणि विरोधकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. मात्र, राजकीय आणि प्रशासकीय संवेदनेच्या दुष्काळात येथे शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हिच माफक अपेक्षा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI