मुंबई : राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता त्यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पाने जोडण्यात येतील. या पानांवर विद्यार्थ्यांकडून वर्ग कार्यांमध्ये शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी करायच्या आहेत. शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रं, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य या पानांवर नोंद करून ठेवायची आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आज त्याचा जीआर निघाला आहे. 


शाळेमध्ये शिक्षक प्रत्यक्ष काय शिकवतात? याच्या नोंदी या पानांवर करण्यात येतील. यावरून वर्ग कार्याचा स्तर कसा आहे? हे समजू शकेल. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील. राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीसाठी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावी व त्यामध्ये प्रत्येक घटक, पाठ, कविता यानंतर वहीचे एक पान समाविष्ट करण्यात येणार आहे. 


इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके देखील चार भागांमध्ये तयार करण्यात येऊन त्यामध्ये देखील आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठे समाविष्ट करण्यात येणार आहेत. खासगी आणि बिनाअनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला पूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे असलेला साठा संपल्यांतर ती पाठ्यपुस्तके एकूण चार भागांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023 आणि 24 साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 


शासकीय शाळांमध्ये या योजनेचा फायदा झाल्यास व त्याप्रमाणे अशा पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याची भविष्यात मागणी झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येतील. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांमध्ये अनिवार्य विषयांचे एकूण चार भागांमध्ये विभागणी करण्यात यावी. परंतु श्रेणी तसेच वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वातंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. श्रेणी व वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये समाविष्ट न करता विद्यार्थी पालक विक्रेते व शासकीय योजनेत होणाऱ्या मागणीनुसार स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. 


कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पुस्तकांच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येतील आणि ही पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात यातील. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्याने पुस्तकांच्या सध्या असलेल्या किमतीत यामुळे वाढ होणार आहे. या योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन पुढील शैक्षणिक वर्षापासून या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI