लातूर : कधीकाळी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परक्षेत अव्वल येणारा विद्यार्थी हा लातूरचाच (Latur) असायचा, येथील शिक्षणाचे दाखले महाराष्ट्रभर दिले जायचे, अगदी दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही लातूर पॅटर्नचा आपल्या भाषणात उल्लेख करायचे. तोच लातूर पॅटर्न आता जेईई आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षांचं केंद्र बनलं आहे. त्यामुळे, आजही लातूर पॅटर्नची महाराष्ट्रात, पर्यायाने देशभरात चर्चा असते. मात्र, दोन दिवसांपूर्वी नीट परीक्षेतील घोटाळ्याचे कनेक्शन थेट लातूरमध्ये लागल्याने लातूरमधील दुसरी बाजू समोर आली आहे.  वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरमध्ये सापडल्यानंतर लातूर पॅटर्नच्या यशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींची नावे निष्पन्न झाली असून पोलीस तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे देशाच्या शैक्षणिक (Education) क्षेत्रात लातूरचे नाव काही अंशी धुळीस मिळाले असून लातूर पॅटर्नवर शंका निर्माण झाल्या आहेत. पण, या घटनेमुळे लातूर पॅटर्नचं महत्त्व कमी होणार नसल्याचा विश्वास लातूरमधील शिक्षण क्षेत्रातील जाणकरांना आहे.  


लातूर पॅटर्नच्या नावाने शैक्षणिक हब बनलेल्या लातूरमध्ये नीट प्रकरणातील कारवाईनंतर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. मात्र, लातूर पॅटर्न हा येत्या काही वर्षात नव्हे तर तब्बल 30 वर्षाच्या मेहनतीनंतर उभा टाकला आहे. त्यामुळे, लातूर पॅटर्न अशा घटनांमुळे डागाळणार नाही, असा विश्वास येथील शैक्षणिक क्षेत्रातील काही मान्यवरांना आहे. 


अनेक महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांनी गत 30 वर्षात प्रचंड मेहनत करून विद्यार्थी घडवले आहेत. मात्र, शिक्षणाचा गोरखधंदा मांडलेल्या काही लोकांमुळे हा लातूर पॅटर्न बदनाम होतोय, हे जरी खरे असले तरी याचा कोणताही परिणाम इथल्या शैक्षणिक वातावरणावर होणार नाही, असा विश्वास खासगी कोचिंग क्लासेस चालवणारे प्रा. सतीश पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, यातील दोषी लोकांपर्यंत तपास यंत्रणा निश्चित पोहोचेल आणि त्यांच्यावर कडक शासन केलं जाईल. देशभरातच त्याबाबत सरकार सजग झाले असून तपास यंत्रणाही अलर्ट मोडवर काम करत आहेत. त्यामुळेच, अशा अपप्रवृत्तींमुळे लातूर पॅटर्नला कुठेही गालबोट लागणार नाही, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.


30-35 वर्षांच्या सातत्याचा हा पॅटर्न


काही काळासाठी आलेल्या अपप्रवृत्तीमुळे मागील 30 वर्षापासून सुरू असलेला लातूर पॅटर्नचा नावलौकिक खराब होणार नाही. कारण लातूर पॅटर्न हा दोन-चार वर्षाचा नव्हे तर यासाठी मागील 30-35 वर्षापासूनच्या सातत्याच्या पॅटर्न आहे. लातूर पॅटर्नसाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. सुदृढ वातावरणात शैक्षणिक क्षेत्रातील बदल टिपत स्वतः अपडेट होत हा पॅटर्न नावारूपाला आला आहे. त्यासाठी येथील शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बरीच मेहनत घेतली आहे. अशा अपप्रवृत्ती येत असतात, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईलच. यातील दोषींना कडक शासन झालेच पाहिजे, अशा भावना लातूरमधील क्लासेस परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. 


दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी     


महाराष्ट्रात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यानावाने जसं लातूर प्रसिद्ध आहे. तसेच, शैक्षणिक हब म्हणूनही लातूर जिल्हा नावारूपाला आला आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी इथे 11 वी, 12 वी आणि रिपीटर बॅचमध्ये शिक्षण घेत असतात. दरवर्षी येथील निकाल नवीन शिखरं गाठत असतो. 


नीट गोंधळावर विद्यार्थी संतप्त


दरम्यान, नुकतेच वैद्यकीय प्रवेशासाठी देण्यात आलेल्या (NEET) परीक्षेत घोळ असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची तयारी करण्याची वेळ आली आहे. श्रम, वेळ आणि पैसा पुन्हा एकदा खर्च करण्याची स्थिती या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे. आमच्यात गुणवत्ता असून आम्ही मार्क घेतल्यानंतर सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणे अवघड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी रिपीटर बॅचला प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.       


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI