Vidarbha Weather Update : : नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोलीसह  यवतमाळ, वाशिम येथे देखील मुसळधार पावसाच्या (Heavy Rain)  सरी कोसळल्या आहेत. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे. तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे.

  


वाशिमच्या काकडदाती गाव परिसरात शेतीला  तलावाचे स्वरूप


सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावलीय. वाशिम तालुक्यातील काकडदाती परिसरासह अनेक भागात  मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढल्यानं शेतीत पेरलेल्या बियाण्यांसह खरडून गेलीय. या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत. तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. या सर्व नुकसानीचे पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.


यवतमाळच्या नेर तालुक्यात मूसळधार पाऊस


यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास जवळपास 1 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी फकिरजी महाराज मंदिर जवळून गेलेल्या नाल्याला चांगलाच पूर आला. तसेच नदी-नाल्या काठावरील शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केल्या जात आहे.


दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात जोरदार पावसाची हजेरी


मागील दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं वातावरणात प्रचंड उकडा निर्माण झाला होता. अशात काल सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसानं वातावरणात सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. तर, या पावसाने शेतकरी राजा देखील सुखावला असून आता शेतीच्या खरीप हंगामाची लगबग बघायला मिळणार आहे. मोहाडीसह भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी हलक्या ते माध्यम सरी बरसल्यात. त्यामुळे शेतकरी राजा आनंदीत झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या