Education News : पाठ्यपुस्तकांना (Textbook) वह्यांची पानं (Notebook Pages) जोडण्यासंदर्भातील शासन निर्णयात (GR) शिक्षण विभागाने (Education Department) बदल केला आहे. आता इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. याआधी इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्यासंदर्भात शासन निर्णय मागील आठवड्यात जारी करण्यात आला होता. याशिवाय इयत्ता पहिलीचे पुस्तकही चार विभागात विभागले जाणार आहे. यामध्ये सुद्धा काही वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंचं दप्तराचं ओझं कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं शासन निर्णयात म्हटलं आहे. 


शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पानं समाविष्ट करण्याची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. त्यानंतर  पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात गुरुवारी (2 मार्च) प्रसिद्ध केला होता. 


राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खासगी आणि बिनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील.


नोंदीसाठी वह्यांची पानं जोडणार


इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडा, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात त्यासाठी पुस्तकांना वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. माझी नोंद या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर लिहिणार आहेत. तसंच शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रं, महत्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्य या पानांवर नोंद करुन ठेवायची आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याचा 2 मार्च रोजी जीआर निघाला होता. आता शिक्षण विभागाने यात बदल केला आहे. 


पुस्तकांच्या किंमती वाढणार


इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीची पाठ्यपुस्तके सुद्धा चार भागांमध्ये विभागली जाणार असून वह्यांची पाने याला जोडल्याने पुस्तकांच्या किमती या वाढणार आहेत.  समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आणि खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करुन त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येतील आणि ही पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील.


संबंधित बातमी


यापुढे तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्याची पाने, राज्य सरकारचा निर्णय


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI