मुंबई : कोराना काळानंतर राज्यातील  ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक (Education) स्थिती खालवल्यावर पुन्हा एकदा समोर आलंय. विद्यार्थ्यांना सोपी गणितं (Maths), मराठी (Marathi), इंग्रजी (English) वाचनात अडचणी निर्माण होत असल्याचा अहवाल असरने (ASER) प्रकाशित केलाय.  कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे ऑनलाइन माध्यमातून दिले जात होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची लिखाण करण्याची सवय तुटल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता कोरोना काळानंतर ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता खालावल्याचं चित्र आहे. 


दरम्यान देशातील 28 जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये राज्यातील फक्त नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात कोरोना काळात खंड पडला होता.  त्यानंतर 2018 - 19 नंतर यंदाच्या वर्षात म्हणजेच 2022-23 या वर्षाचा असर अहवाल जाहीर करण्यात आलाय. 


शिक्षणाची दैना समोर


प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर केलेल्या असर सर्वेक्षणातून शिक्षणाची दैना समोर आलीये. कोरोना काळापूर्वी झालेल्या सर्वेक्षण अहवालाच्या तुलनेत किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 8 ते 10 टक्क्यांनी घटले आहे. इतकेच नव्हे तर शाळेतील पायाभूत सुविधांची उपलब्धता देखील कमी झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. 


अहवाल काय सांगतो?


या अहवालानुसार साधारणपणे  दहा ते बारा साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद दुसरीच्या विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे. त्यानुसार,  एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. आजीला तिने तिच्या घरी पूजेला बोलावले होते. आजीने आपल्या सामानाचे गाठोडे बांधले. अशा स्वरुपाचा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आला होता. मात्र, पाचवीतील साधारण 44 टक्के आणि  आठवीतील 24 टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत. 


वजाबाकी - भागाकाराची फारकत


पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा करण्यास सांगण्यात आले. मात्र अशा स्वरूपाचे गणित अवघ्या 19.6 टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले नाही. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस, एक अंकी संख्येने भागण्यास सांगितले. मात्र, अशा स्वरूपाचे गणित सोडवू शकणाऱ्या इयत्ता आठवतील विद्यार्थ्यांचे प्रमाण 40.7 टक्के वरुन 34.6 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. 


 इंग्रजी वाचनाचाही बोऱ्या


What is the time? / This is a large house. / I like to read, अशी वाक्य पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आली होती. ही वाक्य वाचू शकणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण 25.5 टक्के आणि आठवीतील विद्यार्थ्यांची प्रमाण 49.2 टक्के होते. तसेच आठवीतील 5 टक्के विद्यार्थी आणि पाचवीतील 10 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी कॅपिटल अक्षरेही ओळखता आली नाहीत. 


1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले


यंदा 14 ते 18 वर्षे या वयोगटातील म्हणजे साधारण आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिक, गणिती कौशल्ये, त्याचे प्राथमिक पातळीवर उपयोजन अशा बाबींचे 1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. राज्यात कोरोनापूर्व शैक्षणिक वर्षापूर्वीच्या तुलनेत शाळांमधील पायाभूत सुविधांचे प्रमाणही घटले असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.


अहवालात नापासांचा टक्का किती?


या अहवालात सर्वेक्षण करण्यात आलेल्या विविध प्रकारांमधून नापासांचा टक्का काढण्यात आला. यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये वजाबाकीमध्ये 68 टक्के, मराठी वाचन 44 टक्के, इंग्रजी वाचन 76 टक्के असा नापासांचा टक्का आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीमध्ये भागाकारामध्ये 80 टक्के, मराठी वाचन 24 टक्के, इंग्रजी वाचन 51 टक्के असा नापासांचा टक्का आहे. 


असर अहवालावर केवळ तात्कालिक प्रतिक्रिया देणं चुकीचं असून ठोस उपाययोजना गरजेची असल्याचं मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय. गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागातही खासगी शिकवण्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे. दरम्यान, देशातील फक्त 28 जिल्ह्यांच्याच आधारे हा अहवाल जाहीर करण्यात आलाय. त्यात महाराष्ट्रातील फक्त नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. अशात, संपूर्ण राज्याचे मुल्यमापन एकाच जिल्ह्याच्या आधारे योग्य नाही. मात्र, मागील काही वर्षात शैक्षणिक गुणवत्तेचा खालावणारा दर्जा ही सध्या चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जातंय.


हेही वाचा : 


ASER Report 2024: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना, तर अनेकांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना; ASER सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI