Nashik News नाशिक :  अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्याची धामधुम सुरु असतानाच नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून (Shivsena UBT) महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून होर्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाच्या होर्डिंग समोरच तर शिंदे गटाकडून देखील होर्डिंग लावण्यात आले आहेत.


राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. एक एक मतदारसंघासाठी युती आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नाशिकचे महत्वदेखील कमालीचे वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच नाशिकमध्ये दौरा पडला. यानंतर आता ठाकरे गटाकडून महाअधिवेनाची जंगी तयारी सुरु आहे. शहरातील विविध भागात ठाकरे गटाकडून होर्डिंग उभारण्यात येत आहेत.  


नाशिकमध्ये पुन्हा होर्डिंग वॉर चर्चेत


त्यानिमित्त धनुर्धारी श्रीरामाची प्रतिमा आंनी त्यापुढे उद्धव ठाकरेंची छबी असणारे होर्डिंग नाशिकमध्ये लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने मोदींची छबी आणि काळाराम मंदिराची प्रतिमा असणारे होर्डिंग शहरात लावण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा होर्डिंग वॉर चर्चेत आहे. 


'हुकूमशाही के रावण को हम सब मारेंगे'


उद्धव ठाकरे हे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसून तर नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन  घेणार आहेत. एक रावण को श्रीराम ने मारा, हुकूमशाही के रावण को हम सब मारेंगे, जय श्रीराम अशा आशयाचे होर्डिंग उद्धव ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये लावण्यात येत आहे. 


22, 23 जानेवारीला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन


शिवसेना उबाठा गटाकडून 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जात आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असून ठाकरे गटाच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. 1994 ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील अधिवेशन ऐतिहासिक करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. मात्र यावरूनही शिवसेना भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन आरतीदेखील करणार आहेत. 


पंतप्रधानांनी घेतले नाशिकला प्रभू श्रीरामाचे दर्शन


काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारीला दर्शन घेतले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. यावेळी प्रधान संकल्प देखील करण्यात आला. तसेच रामरक्षा पठण देखील करण्यात आले.


आणखी वाचा 


Nashik Leopard News : अखेर बिबट्या मादी अन् बछड्यांची झाली भेट, घटना कॅमेऱ्यात कैद