Indian Scientist: डॉ. मेघनाद साहा हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. साहा समीकरण तयार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. हे समीकरण ताऱ्यांच्या भौतिक आणि रासायनिक स्थिती स्पष्ट करण्याशी संबंधित आहे. आज भारताचे सरकारी कामकाज ज्या दिनदर्शिकेनुसार सुरू आहे. ती राष्ट्रीय दिनदर्शिका (Indian National Calendar) तयार करण्यातही साहा यांचं महत्वाचं योगदान आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका ही साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि 22 मार्च 1957 रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका आहे. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती आणि अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. या बातमीद्वारे डॉ. मेघनाद साहा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


मेघनाद साहा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 रोजी बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील शाओराटोली गावात झाला. मेघनाद साहाच्या वडिलांचे नाव जगन्नाथ साहा होते. आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील जगन्नाथ साहा हे एक छोटे दुकानदार होते. हालाकीची परिस्थिती असल्याने जगन्नाथ यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च उचलणे कठीण जात होते. यासाठीच प्राथमिक शिक्षणानंतर मेघनाद यांनी दुकानाच्या कामात मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र मेघनाद याची इच्छा पुढे शिक्षण घेण्याची होती.


त्यांच्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होत होते 


मेघनाद साहा हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. विज्ञान विषयाची त्यांना अधिक आवड होती. वर्गात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी शिक्षकही थक्क होत होते. एकदा त्यांनी सूर्याभोवती वर्तुळ आकारात फिरणाऱ्या आवरणाबद्दल विचारले. ज्याचे उत्तर त्यांचे शिक्षक देऊ शकले नाही. त्यावेळी मेघनाद यांनी आपण याचा शोध लावून याची माहिती काढणार असल्याचे शिक्षकांना सांगितले होते. यावरून मेघनाद खूप हुशार असल्याचे शिक्षकांना जाणवले. मात्र त्याचे कुटुंबीय मेघनाद यांना पुढे शिकू देणार की नाही, असा प्रश्न शिक्षकांना पडला. मेघनाद यांचं शिक्षण थांबू नये, असे त्यांना वाटत होते. यानंतर त्यांनी स्वतः मेघनाद यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले. याबाबत शिक्षकाने मेघनाद याच्या भावाशी चर्चा केली.   


मेघनाद यांचा भाऊ त्यांच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, मेघनाद अभ्यासात खूप हुशार आहे. त्याचे शिक्षकही तसे सांगत आहेत. त्याने पुढे शिक्षण घ्यावे, अशी शिक्षकांची इच्छा आहे. यावर वडिलांनी सांगितले की, मेघनाद खूप हुशार आहे. पण त्याला दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागेल. ज्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. याबाबत मदत करण्यासाठी डॉ.अनंत यांच्याशी बोलू, असे मेघनाद यांच्या भावाने वडिलांना सांगितले. त्यांच्या वडिलांनी यावर आपली संमती दर्शवली. डॉ. अनंत कुमार हे एक कुशल आणि प्रभावी डॉक्टर होते. तसेच ते एक चांगले व्यक्ती देखील होते. डॉ.अनंत दास यांनी मेघनाद साहा यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली. मेघनाद यांनी दुसऱ्या गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. पुढे ते डॉ.अनंत कुमार यांच्या घरी राहत होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर मेघनाद साहा यांनी केवळ आपल्या शाळेतच नाही तर संपूर्ण ढाका जिल्ह्यात आठवीत सर्वाधिक मार्क मिळवले. त्यानंतर  मेघनाद साहा यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. सोबतच त्यांना ढाका येथील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला.


स्वातंत्र्य लढ्यात घेतला भाग


त्याच काळात देशभर स्वातंत्र्यलढ्याची आग धगधगत होती. मेघनाद याशी प्रभावित झाले होते. बंगालचे राज्यपाल त्यांच्या शाळेला भेट देणार होते. राज्यपालांच्या आगमनानिमित्त मेघनाद साहा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आंदोलनात भाग घेतला. याच्या परिणामी, मेघनाद यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. मेघनाद यांना त्यांच्या साथीदारांसह शाळेतून काढून टाकण्यात आले. मात्र त्यांना किशोरीलाल ज्युबिली स्कूल या खाजगी शाळेत प्रवेश मिळाला. पुढे साहा हे इंटरमिजिएट परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर कलकत्ता विद्यापीठात साहा यांनी संपूर्ण विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत साहा यांची वाटचाल प्रगती आणि विकासाच्या दिशेने सुरू झाली.  


शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसू शिक्षक म्हणून लाभले 


इंटरमिजिएटनंतर मेघनाद साहा पुढील पदवी शिक्षणासाठी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये दाखल झाले. जिथे जगदीशचंद्र बसू आणि प्रफुल्ल चंद राय सारखे मोठे शास्त्रज्ञ त्यांचे शिक्षक होते. तसेच सत्येंद्र नाथ बसू त्यांचे वर्गमित्र होते. एकदा डॉ. बसू त्यांना म्हणाले, ''मेघनाद तुला गणितात विशेष रस आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु विज्ञानाची इतरही क्षेत्रे आहेत. तू भौतिकशास्त्रावर भर दे. तू आमच्यासोबत प्रयोगशाळेत येत जा.'' यानंतर वेळ मिळाल्यावर मेघनाद साहा प्रफुल्लचंद राय आणि डॉ जगदीशचंद्र बसू यांच्या प्रयोगशाळेत पोहोचायचे. ते त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐकायचे आणि त्यानुसार अभ्यास करत होते. बीएस्सी करत असताना मेघनाद याचे मन वैज्ञानिक शोधांमध्ये मग्न झाले. पुढे मेघनाद साहा यांनी आपल्या नाव-नवीन शोधांनी विज्ञान जगताला चकित केले.


सरकारी नोकरी मिळाली नाही


एमएस्सी केल्यानंतर मेघनाद साहा यांची भारतीय वित्त विभागात निवड झाली, पण शालेय जीवनात सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांना पाठिंबा दिल्याने आणि राज्यपालांच्या शाळाभेटीला विरोध केल्यामुळे साहा यांना सरकारी नोकरी मिळाली नाही. मात्र साहा निराश झाले नाहीत. त्यांनी ही एक संधी म्हणून घेतली आणि नवीन शोधांवर लक्ष केंद्रित केलं. आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. मेघनाद साहा सायकलवरून प्रवास करत अनेक ठिकाणी जात शिकवणी घेत असत. काही काळानंतर मेघनाद साहा आणि त्यांचे मित्र सत्येंद्र नाथ बसू यांची कलकत्ता येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली.


सूर्य आणि ताऱ्यांशी संबंधित माहिती देणारा फॉर्म्युला शोधला 


आपल्या अभ्यासादरम्यान त्यांना अग्निस क्लर्क यांचे 'स्टार फिजिक्स' हे प्रसिद्ध पुस्तक मिळाले, ज्यामुळे त्यांना एक नवी दिशा मिळाली. Thermodynamics, सापेक्षता आणि अणु सिद्धांत हे त्या काळी भौतिकशास्त्राचे नवीन विषय होते. या विषयांचा अभ्यास करून मेघनाद यांनी शिकवायला सुरुवात केली. या विषयांवर नोट्स काढत असताना मेघनाद साहांच्या समोर Astro Physics चा एक प्रश्न उभा राहिला. याच प्रश्नाचे उत्तर शोधून ते  जगप्रसिद्ध झाले. मेघनाद साहाच्या शोधांपैकी एक म्हणजे आयनीकरण फॉर्म्युला. हा फॉर्म्युला भौतिकशास्त्रज्ञांना सूर्य आणि इतर तार्‍यांचे अंतर्गत तापमान आणि दाब याबद्दल माहिती देण्यास सक्षम आहे. एका प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञाने या शोधला भौतिकशास्त्रातील 12वा सर्वात मोठा शोध म्हटले आहे.


खगोल भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान


1920 मध्ये साहा इंग्लंडला गेले, जिथे ते अनेक शास्त्रज्ञांच्या संपर्कात आले. त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला आणखी चमकण्याची संधी मिळाली. 1921 मध्ये ते मायदेशी परतले. मेघनाद साहा हे कदाचित पहिले शास्त्रज्ञ होते जे इतक्या लहान वयात त्यांच्या शोधांसाठी प्रसिद्ध झाले आणि रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले. त्यांच्या मार्गात अनेक अडथळे येत राहिले. त्या काळी आपल्याच देशातील काही शास्त्रज्ञांनी त्यांच्या सुत्राबाबत असहमती दर्शवली आणि अलाहाबाद विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात त्यांच्या पदभार स्वीकारण्यात अडथळे निर्माण केले. पण मेघनाद साहा या गोष्टींनी विचलित झाले नाही. 1923 मध्ये ते प्रयाग विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष झाले. भौतिकशास्त्राव्यतिरिक्त मेघनाद साहा यांना प्राचीन भारताचा इतिहास, जीवशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र या विषयांनी देखील आकर्षित केले. त्यांनी सूर्यप्रकाशातील रेडिओ लहरी आणि रेडिओ क्रियाकलापांवर संशोधन केले.


आईन्स्टाईन यांनीही केले होते कौतुक 


डॉ. साहा यांच्या उच्च तापमानातील घटकांच्या सिद्धांताला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगाला एक विशेष भेट असल्याचे म्हटले होते. साहा यांनी आईन्स्टाईन यांच्या संशोधन ग्रंथांचा अनुवाद देखील केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज कलकत्ता विद्यापीठात न्यूक्लियर फिजिक्स शिकवले जात आहे. साहा अणुऊर्जेच्या सकारात्मक वापराच्या बाजूने होते. त्यांनी 1950 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्सची स्थापना केली. कलकत्ता विद्यापीठाने डॉ. साहा यांच्यासाठी ट्रॅव्हलिंग फेलोशिप आयोजित केली होती. त्यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान डॉ. साहा यांनी आपला अभ्यास आणि शोध सुरू ठेवला. 


राजकारणातही होते सक्रिय 


शास्त्रज्ञ असण्यासोबतच डॉ.साहा हे सर्वसामान्यांमध्येही लोकप्रिय होते. ते 1952 मध्ये भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत उतरले. कलकत्ता येथून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने त्यांचा विजयी झाला होता. त्यांनी यापूर्वी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसोबत राष्ट्रीय नियोजन समितीवर काम केले होते. 16 फेब्रुवारी 1956 रोजी साहा हे नियोजन आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे जात असताना अचानक ते कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI