यवतमाळ:  उमरखेड ( Umerkhed Minor Girl Viral Photo) येथील अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी भाजपच्या महिला (BJP Mahila Aghadi) कार्यकर्ता डॉ. सायली शिंदे (Dr. Sayali Shinde) यांच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करत अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी आपल्याला फसवलं जात असून जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात असल्याचा आरोप सायली शिंदे यांनी केला आहे.

  
दोन दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्याच विषयामध्ये यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पिडीत मुलीची सायली शिंदे यांनी भेट घेतल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. उमरखेड येथील एका कार्यकर्त्यांने सायली शिंदे यांच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामध्ये भारतीय दंड सहित 228-A, 500, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 आणि बालकाची लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार 23 (4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार 66(E) यानुसार उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आज पोलिसांनी सायली शिंदे यांना अटक केली.


एखाद्या मुलीवर, महिलेवर किंवा अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार झाला तर तिची कोणतीही ओळख समाजासमोर आणू नये, तिचे नाव वा फोटो प्रकाशित करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालायने या आधी दिले आहेत. या प्रकरणात अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सायली शिंदे यांची प्रतिक्रिया 


दरम्यान पोक्सो अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईवर सायली शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, 10 तारखेला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. तिने एका सराईत गुन्हेगाराकडून स्वतःची सुटका करुन घेतल्यानंतर तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तिच्यासोबत माझ्या मोबाईलमध्ये फोटो घेतले होते. पण शुक्रवारी एका कार्यकर्त्यांने माझ्या मोबाईलमधून ते फोटो घेतले आणि व्हायरल केले. हे माझ्या विरोधात करण्यात आलेले षडयंत्र आहे. मी गोरगरिबांसाठी काम करत आहे, त्यामुळे माझ्याविरोधात जाणीवपूर्वक हे केलं जात आहे. तसेच या भागात एवढ्या समस्या आहेत, मी त्यावर आवाज उठवते. त्या समस्या बाहेर येऊ नयेत यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा: