Crime News Updates : बॉलिवूडचा दृश्यम चित्रपट (Bollywood Drishyam Movie) म्हणजे, अगदी अंगावर काटा आणणारा चित्रपट. दृश्यम चित्रपट पाहताना प्रत्येक क्षण उत्कंठा वाढवणारा आहेच, पण त्यासोबतच अंगावर शहारे आणणाराही आहे. छत्तीसगढ मध्येही दृश्यम चित्रपटाशी मिळता जुळता प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कबीरधाम जिल्ह्यात एका 28 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची भीषण घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यापैकी एक मृत महिलेचा पती आहे, तर दुसरा त्या महिलेचा प्रियकर असल्याचं समोर आलं आहे. 'दृश्यम' हा बॉलिवूड चित्रपट पाहून मारेकऱ्यांनी कट रचला होता. त्यांनी चित्रपटात दाखवलेल्या युक्त्या अवलंबून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दोघांनाही पकडलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी जिल्ह्यातील कल्याणपूर गावातील रहिवासी रामखिलावन साहू यांनी लोहारा पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. बेवफाईच्या संशयावरून महिलेच्या पतीनं तीन वर्षांपूर्वी तिला सोडून दिल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर ती कल्याणपूर येथील तिच्या वडिलोपार्जित घरी गेली आणि तिथेच राहू लाहली.
पीडित महिला आणि तिचा पती लुकेश साहू (29) यांचा घटस्फोट झाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, तो महिलेला तिच्या तीन मुलांसाठी दर महिन्याला काही पैसे देत होता. यामुळे त्याच्यावर कर्ज जमा झालं होतं. पण महिला काही दिवसांनी तिच्या आई-वडिलांच्या घराजवळच राहणाऱ्या राजा राम या दुसऱ्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. पण, महिला आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी तिच्या प्रियकराकडे पैसेही मागू लागली. त्यामुळे तो तिला कंटाळला होता.
नेमकं घडलं काय?
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी राजा रामच्या म्हणण्यानुसार, त्यानं पीडितेला त्याच्या दुकानातून 1.50 लाख रुपये रोख आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं दिली होती. दरम्यान, राजा राम आणि लुकेश साहू या दोघांनीही एकमेकांशी संवाद साधून भेट घेण्याचं ठरवलं. दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते आणि त्यांना महिलेपासून स्वतःची सुटका करायची होती. त्यामुळे दोघांनी तिला मारण्याचा निर्णय घेतला. दोघेही महिनाभरापासून महिलेचा खून करण्याचा कट रचत होते. नेमका याचवेळी त्यांनी अजय देवगणचा 'दृश्यम' हा चित्रपट पाहिला.
पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपींनी सांगितलं की, दोघांनीही अजय देवगणचा गाजलेला 'दृश्यम' हा चित्रपट एकदा नव्हे तर, चार वेळा पाहिला आहे, जेणेकरून त्यांना हत्येच्या पद्धती शिकता याव्यात आणि अटक टाळण्यासाठी कट रचणं सोपं जाईल. 19 जुलै रोजी राजा रामनं महिलेला बोलावून दुचाकीवर घनीखुटा जंगलात नेलं. पूर्वनियोजित कटानुसार, लुकेशही तिथे पोहोचला. या दोघांनी महिलेचा साडीनं गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.
हत्येचं गूढ कसं उलगडलं?
यानंतर दोघांनी तिचा मृतदेह खोल दरीत पुरला. करनाळा बॅरेजमध्ये दुचाकी आणि तिचा मोबाईलही फेकला. तिचे दागिनेही गावातील विजेच्या खांबाजवळ जमिनीखाली लपवून ठेवले. मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खणण्यासाठी वापरलेली शेतीची अवजारं सरकारी शाळेजवळील नाल्यात फेकून दिली. मात्र, तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफिनं दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :