Raksha Bandhan 2024 : यंदा श्रावण (Shravan) महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा म्हणजेच रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) दिवस साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात, या दिनाला फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. तसेच, भावाच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. तर, आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन भाऊ या दिवशी बहिणीला देतो. 
पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. 


मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही भद्राच्या सावटाखाली रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, भद्राकाळचा मुहूर्त आणि या काळात राखी का बांधू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


रक्षाबंधनाची योग्य तिथी (Raksha Bandhan Tithi)


यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी आहे. या दिवशी सोमवारी पौर्णिमा असून पहाटे 03.04 वाजता सुरु होणार आहे. तर हा मुहूर्त रात्री 11.55 वाजता समाप्त होईल. 


भद्राकाळ केव्हा असणार? (Bhadra Kaal Time 2024)


यावर्षी सुद्धा भद्राकाळच्या सावटाखाली रक्षाबंधनाचा सण असणार आहे. याची वेळ सोमवारी सकाळी 5.53 पासून सुरु होऊन दुपारी 1.32 पर्यंत असणार आहे. याचाच अर्थ तब्बल 8 तासांचा हा काळ असेल. या काळात भावाला राखी बांधणे अशुभ असते. त्यामुळे भद्राकाळात चुकूनही राखी बांधू नका. 


रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त (Raksha Bandhan Shubh Muhurta)


सोमवारी 19 ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त दुपारी 1.32 पासून संध्याकाळी 04 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही भावाला राखी बांधू शकता. 


भद्राकाळात राखी का बांधू नये?


पौराणिक मान्यतेनुसार, भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच, शनीदेवाची बहीण आहे. मान्यतेनुसार, भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्राकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत, या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो , तेव्हा बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते.


दुसर्‍या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्राही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहुकालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. रक्षाबंधनाचा सण भद्राकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Raksha Bandhan 2024 : 18 की 19 ऑगस्ट? यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी? यंदाही राहणार भद्राचं सावट? वाचा A To Z माहिती