UP Crime News : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं स्वतःला गंगेच्या स्वाधीन करुन आयुष्य संपवलं आहे. पतीचा मृतदेह सापडला, मात्र, पत्नीचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. दरम्यान, पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृत्यूपूर्वी या जोडप्यानं एक सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये त्यांनी कर्जाच्या त्रासामुळे जीवन संपवल्याचं लिहिलं होतं. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. या दाम्पत्याच्या पश्च्यात दोन निरागस मुलं आहेत.


उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये राहणाऱ्या या सराफा व्यापाऱ्याचं नाव सौरभ बब्बर आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव मोना बब्बर आहे. दोघांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोघांनी आपल्या घरापासून लांब जाऊन आत्महत्या करण्याचं ठरवलं. दोघेही बाईक घेऊन निघाले आणि तब्बल 100 किलोमीटरतं अंतर कापलं आणि हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर शेवटच्या वेळी एकत्र सेल्फी घेतला. त्यांच्या मित्राच्या व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट पाठवली आणि दोघांनी एकमेकांचा हात धरून गंगेत उडी घेतली. सौरभचा मृतदेह सापडला असून त्याची पत्नी मोनाच्या मृतदेहाचा शोध मात्र, अद्याप सुरू आहे.


नेमकं काय घडलं? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्यावसायिक असलेल्या सौरभवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं. मात्र, कर्जाचे हफ्ते फेडता येत नसल्यानं तो त्रस्त झाला होता. नाईलाजानं त्यानं आपली पत्नी मोनासोबत हरिद्वारच्या गंगेत उडी घेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये सौरभनं लिहिलं की, कर्जात पुरते बुडालोय, हफ्ते भरुन भरुन कंटाळलोय. आता आम्ही अजून हफ्ते भरू शकत नाही. त्यामुळे मृत्यूकडे स्वतः सोपवतोय. जिथून कुठूनही आत्महत्या करू, तिथून सेल्फी पाठवू." 


सौरभ बब्बर मागच्या काही दिवसांपासून गायब होते. सहारनपूरमध्ये ते गोल्ड कमिटी नावानं ओळखले जात होते. आज सकाळी त्यांचं पार्थिव सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सौरभ बब्बर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये 10 ऑगस्ट ही तारीख लिहिण्यात आली आहे. तर सेल्फीमध्ये कॅमेरा टाईम 10 ऑगस्ट 2024 आणि 1 वाजून 23 मिनिटं दाखवत आहे. आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिलं आहे आणि आता आम्ही आणखी पैसे देऊ शकत नाही. आम्ही दोन्ही मुलांना आजीकडे ठेवून जात आहे, आमचा कुणावरही विश्वास नाही, असं सौरभ यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. 


आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना फोन 


एकीकडे व्यवसायात नुकसान होत होतं, तर दुसरीकडे समिती सदस्यांना पैसे द्यावे लागत होते. तर सौरभकडे पैसे नव्हते. कर्जबुडवे त्याला त्रास देऊ लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून सौरभनं एक भयानक पाऊल उचललं. पत्नीला बाईकवर घेऊन तो सहारनपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिद्वारला पोहोचला आणि तिथे गंगेत उडी मारली. उडी मारण्यापूर्वी त्यानं आपल्या घरी शेवटचा कॉल केला होता, त्याचं रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉलमध्ये सौरभ बब्बर म्हणत आहेत की, हा व्हिडीओ सर्वांना दाखवा, आम्ही हरिद्वारमध्ये आहोत आणि आमचं जीवन संपवत आहोत, आम्ही येथून उडी मारणार आहोत.