Wardha News Update : उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करून 22 वर्षीय मनोरुग्ण तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.  अब्दुल रहीम अब्दुल मजीद (वय, 60), अब्दुल जूनैद अब्दुल रहीम ( वय 22) आणि अब्दुल जमीर अब्दुल रहीम ( वय, 20 सर्व रा. विठ्ठल वार्ड, आर्वी ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.  


गणेश तुकारामजी सोनकुसरे (वय 49 ) हे अमरावती जिल्ह्यातील बेलपुरा येथील रहिवाशी आहेत. त्यांचा मोठा मुलगा मानसिक रूग्ण आहे. संशयित आरोपींनी तुमच्या मुलाला आम्ही नीट करतो असे सांगितल्यामुले सोनकुसरे यांनी उपचार  करण्यासाठी त्यांच्या मुलाला आर्वी येथील संशयित आरोपींकडे घेऊन गेले होते. परंतु, तिन्ही आरोपींनी त्यांच्या राहत्या घरी संगनमत करून मनोरुग्ण असलेल्या तरुणावर तांत्रिक विद्येचा वापर करून उपचार केले आणि त्याचा गळा आवळून ठार केले.  त्यांनतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता मृतदेह परस्पर कुटुंबियांच्या स्वाधीन करत पुरावा नष्ट केला. 


याप्रकरणी मृत तरूणाचे वडील गणेश सोनकुसरे यांनी अमरावती येथील सिटी कोतवाली पोलिसांत तोंडी तक्रार दिली. सिटी पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करून याबाबत आर्वी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार आर्वी येथे संशयितांविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. 


पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोलंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ठाणेदार भानुदास पिदूरकर, फौजदार हर्षल नगरकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयितांना अटक केली.  दरम्यान, संशयितांनी या पूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का? यासह मनोरूग्ण तरूणाची कोणत्या कारणावरून हत्या केली याचा हर्षल नगरकर अधिक तपास करत आहेत.