पुणे : पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक मधील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. कारण प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलानालयाकडे एप्रिलनंतर एकही प्रकरण नोंद नाही.
पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती आहे. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या केसेस घेण्यास राज्यातील रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं दिसून आलंय. किडनी, ह्रदय, आतडे, फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना या प्रकरणाचा फटका बसला आहे.
डॉक्टरांवर झालेल्या अन्यायकारक गंभीर कारवायांमुळे शस्त्रक्रिया थांबलेल्या आहेत. असंख्य रुग्ण जे प्राण वाचवणाऱ्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे जीव टांगणीवर पडले आहेत. समाजावर आरोग्यविषयक अन्याय होत आहे. अशा कारवायांमुळे सर्व डॉक्टर आणि रूग्णालय या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या का थांबावयाच्या या गंभीर या गंभीर विचारात पडले आहेत. सदर प्रकरणामध्ये डॉक्टरांवर केलेलले आरोपपत्र त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (पुणे) केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.