Air India flight : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A320ne0 फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले आहे. टेकऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास या विमानाचे इंजिन बंद पडल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या A320neo विमानाने गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बेंगळुरूसाठी उड्डाण केले,. परंतु, विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर केवळ 27 मिनिटांतच मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे एक इंजिन हवेत बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून देण्यात आली.
या घटनेची माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइनची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आमचे क्रू मेंबर्स देखील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित आहेत. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कार्यसंघांनी ही समस्या त्वरित लक्षात घेतली आणि वेळेवर योग्य पावले उचलली.
इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान वाहतूक नियामक डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या घटनेची चौकशी करत आहे. सकाळी 9.43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत A320neo विमानाच्या पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा मिळाला. त्यामुळे इंजिन बंद झाल्यानंतर विमान सकाळी 10.10 वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आले.